उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी त्यांचे संरक्षण प्रमुख हे बैठकीत झोपल्याने त्यांना तोफगोळय़ांचा मारा करून ठार केले,  दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने या माहितीला बुधवारी दुजोरा दिला आहे.
राष्ट्रीय गुप्तचर सेवेच्या अधिकाऱ्यांनी संसदीय समितीच्या बैठकीत सांगितले की, पीपल्स आर्मड फोर्सेस मंत्री योन याँग खोल यांना विमानविरोधी तोफांचा मारा करून हजारो लोकांच्या देखत ठार मारण्यात आले. उत्तर कोरियाच्या काँग कोन लष्करी अकादमीत त्यांना ठार करण्यात आले, असे शिन क्योंग मिन यांनी सांगितले. ली शेऑल वू या आणखी एका खासदाराच्या कार्यालयानेही ही माहिती खरी असल्याचे म्हटले आहे. एनआयएसने  खासदारांना ही माहिती कशी मिळाली हे सांगितले नाही. विविध वृत्तवाहिन्यांवरून माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण कोरियाची एनआयएस ही गुप्तचर संस्था उत्तर कोरियातील घडामोडींवर लक्ष ठेवून असते, पण उत्तर कोरियात सगळा कारभार गुप्तपणे चालत असल्याने तेथील घटनांची खातरजमा  करणे अवघड असते. उत्तर कोरियात हुकूमशहा किम जोंग उन यांनी २०११ मध्ये वडील वारल्यानंतर सत्ता हाती घेऊन त्यावर पकड मजबूत केली. २०१३ मध्ये किम यांनी त्यांचे काका व उपप्रमुख जँग साँग थॅक यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपावरून फाशी दिले होते.