उत्तर कोरिया नष्ट व्हायलाच हवे, या दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याने केलेल्या दर्पोक्तीची त्याला भारी किंमत मोजावी लागेल, असा इशारा उत्तर कोरियाने मंगळवारी दिला. या परस्परांविरोधातील वक्तव्यांमुळे उभय राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा संघर्षांची ठिणगी पडण्याची दाट चिन्हे दिसत आहेत.
उत्तर कोरिया हा वास्तवातील देश नसून केवळ एका व्यक्तीच्या फायद्यासाठी हा देश टिकला आहे, असा टोमणा दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते किम मिन सेओक यांनी पत्रकार परिषदेत मारला होता. सेओक यांनी प्रत्यक्ष नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख हुकूमशहा किम जॉन्ग उन यांच्याकडे होता. उत्तर कोरियात मानवी हक्क नाहीत किंवा तेथे सार्वजनिक स्वातंत्र्यही नाही. उत्तर कोरिया नष्टच व्हायला हवे, असेही त्यांनी म्हटले होते.
सेओक यांच्या या वक्तव्यांची उत्तर कोरियाने अत्यंत गंभीर दखल घेतली. किम यांची वक्तव्ये अत्यंत चिथावणीखोर असून देशाचा सर्वोच्च नेता तसेच देशाच्या यंत्रणेची नालस्ती करणाऱ्यावर कठोर शिक्षा करण्यात येईल, असा इशारा उत्तर कोरियाच्या ‘उरिमिन्झोक्किरी’ या सरकारी संकेतस्थळावरून देण्यात आला आहे. ‘हे गोरे कुत्रे अशा प्रकारे भुंकत असताना आम्ही कदापि स्वस्थ बसणार नाही. किम सेओर यांना त्यांच्या अविचारी वक्तव्यांची भारी किंमत मोजावीच लागेल,’ अशीही धमकी संकेतस्थळावरून देण्यात आली.
किम यांच्या या वक्तव्यामुळे उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेच्या नेत्यांविरोधात अपशब्दांची राळच उडविली आहे.