उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सागरी सीमेलगत तोफगोळ्यांचा मारा केला. कोरियन द्वीपकल्पातील  पूर्व भागातून हे तोफगोळे डागण्यात आले, असे दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले.   दक्षिण कोरियाच्या सीमेवरील सैन्याला अगोदरच दक्षतेचे इशारे देण्यात आले होते, कारण उत्तर कोरियाने नुकत्याच दोन स्कड क्षेपणास्त्रांच्या चाचण्या जपानच्या सागरात केल्या होत्या. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार उत्तर कोरियाला आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यास बंदी आहे. उत्तर कोरिया नेहमीच क्षेपणास्त्र चाचण्या घेत असून दक्षिण कोरिया-अमेरिका यांच्या आगामी संयुक्त नौदल कवायतींचा निषेध करण्यासाठी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे डागली. १६ ते २१ जुलै दरम्यान या कवायती होणार असून अमेरिकेची जॉर्ज वॉशिंग्टन ही युद्धनौता बुसान या दक्षिण बंदरात शुक्रवारीच पोहोचली आहे. यापूर्वी चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांच्या सोल भेटीच्या वेळीही उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या होत्या. प्रक्षोभक अशा लष्करी कारवाया थांबवण्यासाठी उत्तर कोरियाने प्रयत्न करून पाहिले होते पण दक्षिण कोरियाने त्याला दाद दिली नाही.
 दोन्ही देशांतील सागरी सीमारेषा या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रांनी १९५०-५३ च्या कोरियन युद्धानंतर ठरवल्या असून  त्याला आमची मान्यता नाही असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१० मध्ये उत्तर कोरियाने येओनपेआँग बेटांवर तोफगोळ्यांचा मारा केला होता त्यात चार दक्षिण कोरियन नागरिक ठार झाले होते त्यावेळी हा संघर्ष वाढला होता.