अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील शाब्दिक वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. उत्तर कोरियाचे विदेश मंत्री री योंग यांनी सोमवारी अमेरिकेकडून युद्धाची घोषणा करण्यात आल्याचा दावा केला. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीस सडेतोड प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज असल्याचेही योंग यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाची घोषणा केल्याचा आरोप योंग यांनी केला.

ते म्हणाले, सर्व जगाने लक्षात ठेवले पाहिजे की, अमेरिकेने आमच्या देशाविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. पण आम्ही त्यांना योग्य प्रत्युत्तर देऊ. दरम्यान, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी उत्तर कोरियाच्या पूर्व भागातील आंतरराष्ट्रीय हवाईसीमेतून उड्डाण करत आपली ताकद दाखवून दिली होती.

दरम्यान, उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब आणि क्षेपणास्त्र चाचणी केल्यापासून अमेरिका आणि उत्तर कोरियात शाब्दिक युद्ध सुरू आहे. ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत उत्तर कोरियाला इशारा दिला होता.

‘वेडय़ा’ किमला अभूतपूर्व सत्त्वपरीक्षा द्यावी लागेल

ट्रम्प यांनी शनिवारी पुन्हा एकदा उत्तर कोरियाला धमकी दिली होती. उत्तर कोरियाचे विदेश मंत्री आपल्या नेत्याप्रमाणेच बोलत राहिले तर किम जोंग उन आणि ते जास्त दिवस वाचू शकणार नाहीत, असा दम भरला होता.