उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी देशाच्या सेनेला कोणत्याही क्षणी आण्विक हत्यारांचा वापर करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. जाणकारांच्या मते उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीकडून लादण्यात आलेल्या अनेक प्रतिबंधांच्या विरोधातील ही प्रतिक्रिया आहे. विभाजित कोरियाची सद्य परिस्थिती तणावपूर्ण असून रणनितीमध्ये बदल करून पहिला हल्ला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश किम यांनी सेनेला दिले असल्याचे उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था ‘केसीएनए’ने किम यांचा हवाला देत म्हटले आहे. तणावपूर्ण परिस्थितीत उत्तर कोरिया नेहमीच भडक विधाने करत असून, ही केवळ शाब्दिक धमकी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मानणे आहे. उत्तर कोरियाकडे आण्विक शस्त्रांचा छोटेखानी साठा असला तरी या बॉम्बचा मिसाइलद्वारे मारा होऊ शकतो अथवा नाही याबाबत जाणकारांमध्ये मतभिन्नता आढळून येते.
नव्या हाय कॅलिबर मल्टिपल रॉकेट लाँचच्या निरीक्षणादरम्यान आण्विक हत्यारांना कोणत्याही क्षणी उपयोगात आणण्यासाठी तयार राहाण्याचे आवाहन गुरुवारी किम यांनी सैन्याला केल्याचे केसीएनएच्या वृत्तात म्हटले आहे. याच्या काही काळ अगोदर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत उत्तर कोरियावर कडक प्रतिबंध लादण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. उत्तर कोरियाने केलेल्या आण्विक चाचणी विरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीकडून सदर पाऊले उचलण्यात आली आहेत. उत्तर कोरियाने पूर्व समुद्र किनाऱ्यावर १०० ते १५० किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या जवळजवळ अर्धा डझन रॉकेटचा मारा केल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.