उत्तर कोरियाचे नेते किम योंग उन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत त्यांच्याविषयी अनादर दाखवल्यामुळे उपपंतप्रधानांना गोळ्या घालून फाशी देण्यात आले. ते झोपी गेल्याचे भासवण्यात आले, जुलैत ही घटना घडल्याचे असे दक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. इतर दोन अधिकाऱ्यांवर किम राजवटीने बंदी घातली आहे. विविध वृत्तात त्यांच्या पदनामाबाबत संदिग्धता असून काहींनी ते उपपंतप्रधान, काहींनी शिक्षणमंत्री तर काहींनी अधिकारी होते असे म्हटले आहे.

सत्तेवरील पकड घट्ट करण्यासाठी किम योंग उन यांनी अलिकडे काहींना शिक्षा दिल्या आहेत, त्यातीलच हा प्रकार मानला जात आहे. उपपंतप्रधान व शिक्षण खात्याचे मंत्री असलेले किम योंग जिन यांना फाशी देण्यात आले, असे सोलच्या कोरिया एकीकरण मंत्रालयाचे प्रवक्ते जिआँग जून ही यांनी सांगितले. किम यांना गोळीबार पथकाकडून मारण्यात आले. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया व क्रांतिकारक बाबींना विरोध असे आरोप ठेवण्यात आले. किम योंग जिन हे उत्तर कोरियातील पार्लमेंटच्या बैठकीत बसताना व्यवस्थित बसले नव्हते, नंतर त्यांचे जाबजबाब घेण्यात आले असता ते गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले. जूंगअँग इलबो या वृत्तपत्राने म्हटले आहे की, सरकारमधील काही वरिष्ठ व्यक्तींना अशा प्रकारे शिक्षा देण्यात आल्या आहेत.

किम यांनी बोलावलेल्या बैठकीत डुलक्या घेतल्याने त्यांना मारण्यात आले अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यांना घटनास्थळीच अटक करून जाबजबाब घेऊन दोषी ठरवले गेले. कोरिया एकीकरण मंत्रालयाने म्हटले आहे, की दोन जणांना फेरप्रशिक्षणाची शिक्षा देण्यात आली. त्यात दक्षिण कोरियाविरोधी हेरगिरी व कोरिया कामकाज विभागाचे किम योंग चोल यांचा समावेश आहे. ७१ वर्षांचे किम हे लष्कराचे गुप्तचर अधिकारी असून त्यांनी दक्षिण कोरियावर अनेक सायबर हल्ले केले होते. दक्षिण कोरियाची एक युद्धनौका बुडवण्यात त्यांचा हात होता. त्यांना जुलैत अधिकारांचा गैरवापर व उर्मटपणा या आरोपाखाली शिक्षा दिली होती.

आता त्यांना दक्षिण कोरिया विरोधात कारवाया करून एकनिष्ठता सिद्ध करावी लागणार आहे. सरकारच्या स्थापना दिन कार्यक्रमास ९ सप्टेंबरला कोण उपस्थित राहते यावरून फाशीच्या घटनेची अप्रत्यक्ष पुष्टी होऊ शकेल असे उत्तर कोरिया विद्यापीठाचे यांग मून जिन यांनी सांगितले. या वृत्ताची खातरजमा आवश्यक आहे कारण दक्षिण कोरियाने फेब्रुवारीत उत्तर कोरियाचे लष्कर प्रमुख री योंग गिल यांना फाशी दिल्याचे म्हटले होते पण ते मे महिन्यात पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित होते.