अमेरिका व जपानच्या सामरिक तयारीविरुद्ध उत्तर कोरियाची धमकी

अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आम्ही बुडवून आम्ही आमचे लष्करी सामथ्र्य दाखवून देऊ अशी धमकी उत्तर कोरियाने दिली आहे. अमेरिकेच्या युद्धनौकेला साथ देण्यासाठी जपानच्या नौदलाची दोन जहाजेही आली आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएस कार्ल व्हिन्सन ही युद्धनौका कोरियन द्वीपकल्पात पाठवली असून उत्तर कोरियाच्या आण्विक व क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाने अमेरिका व त्यांच्या आशियातील मित्र देशांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने नौदल हल्ला गट नेमक्या कुठल्या दिशेने जात आहे हे सांगितलेले नाही. अमेरिकी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी सांगितले की, आमचे हल्ला पथक लवकरच तेथे येईल पण आम्ही तपशील सांगणार नाही. असे असले तरी उत्तर कोरियाची ताठर भूमिका कायम असून आमची सन्यदले अमेरिकेची अण्वस्त्रसज्ज विमानवाहू युद्धनौका एकाच हल्ल्यात बुडवून टाकतील असे उत्तर कोरियाने म्हटल्याचे रोडाँग सिनमून या सत्ताधारी पक्षाच्या वृत्तपत्राने म्हटले आहे. आम्ही या युद्धनौकेवर हल्ला करून लष्करी सामाथ्र्य दाखवून देऊ असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. किम जोंग ऊन हे डुकरांच्या शेतीची पाहणी करतानाचे छायाचित्र असलेला दोन पानांचा मजकूर या वृत्तपत्राने प्रसिद्ध केला आहे. कोरियन पीपल्स आर्मीचा मंगळवारी ८५ वा स्थापना दिन आहे. त्यानिमित्ताने काही शस्त्रास्त्र चाचण्या करण्यात येणार आहेत. उत्तर कोरियाने पाच अणुचाचण्या आतापर्यंत केल्या असून त्यातील दोन गेल्या वर्षी केल्या होत्या. अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे ते सज्ज करीत आहेत, अमेरिकेवर अण्वस्त्रे टाकण्याचा त्या देशाचा उद्देश आहे. अमेरिकेचे म्हणणे डावलून उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत.