उत्तर कोरिया आता लष्करी बळात अमेरिकेची बरोबरी करण्याच्या जवळ येऊन ठेपला आहे असे त्या देशाचे नेते किम जोंग उन यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने उत्तर कोरियाने केलेली क्षेपणास्त्र चाचणी हे खूपच प्रक्षोभक कृत्य असल्याचे म्हटले होते.

उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, किम यांनी क्षेपणास्त्र चाचणीनंतर एक दिवस उलटताच हे वक्तव्य केले आहे. जपानच्या दिशेने सोडलेले क्षेपणास्त्र ३७०० कि.मी अंतर कापत जपानवरून गेले होते व नंतर ते उत्तर पॅसिफिक महासागरात कोसळले होते. उत्तर कोरियाची ही सर्वात मोठी क्षेपणास्त्र चाचणी होती. आता सोडलेले क्षेपणास्त्र हे हॉसाँग १२ प्रकारचेच होते. या आधीही त्याच प्रकारचे क्षेपणास्त्र २९ ऑगस्टला जपानच्या दिशेने सोडण्यात आले होते. वृत्तसंस्थेने म्हटल्यानुसार किम यांनी क्षेपणास्त्र चाचणीच्या यशाबाबत समाधान व्यक्त केले असून हे क्षेपणास्त्र तैनात करण्यास सिद्ध असल्याचे जाहीर केले आहे.

उत्तर कोरिया अण्वस्त्र कार्यक्रम आता पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही असे किम यांनी निर्बंध लादले असतानाही म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने उत्तर कोरियावर प्रादेशिक शांतता व सुरक्षितता धोक्यात आणल्याचा आरोप केला असून त्यांच्या अणू व क्षेपणास्त्र चाचण्यांनी जगाची सुरक्षा चिंता वाढली असल्याचे म्हटले आहे. अमर्याद निर्बंध घातलेले असताना आता आम्ही अण्वस्त्र कार्यक्रम पूर्ण करीत आणला आहे, अमेरिकेला तोंड देता येणार नाही असा अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता आम्ही मिळवत आणली आहे. त्यामुळे आता आमचे लष्करी सामर्थ्य अमेरिकेच्या तोडीस तोड आहे असा दावा किम यांनी केला आहे.