सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटवर झालेल्या सायबर हल्ल्यांच्या मागे उत्तर कोरियाचाच हात असल्याचे सबळ पुरावे हाती लागले आहेत असा दावा अमेरिकेच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या संस्थेने केला आहे. उत्तर कोरियाचे आगामी लक्ष्य अमेरिका असल्याचे भाकीतही अमेरिकेने वर्तवले आहे.
गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटवर सायबर हल्ला झाला होता. येथे काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांच्या वेतनासह सर्व महत्त्वाची माहिती नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर आपली काही निर्मिती केंद्र बंद करण्याचा कटू निर्णयही सोनी एंटरटेनमेंटने घेतला होता. काही दिवसांपूर्वी या हल्ल्यांमागे उत्तर कोरियाचा हात असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.
या पाश्र्वभूमीवर अमेरिकेच्या तपास यंत्रणेने सखोल तपास केला. तपासाअंती सोनी एंटरटेनमेंटचे संगणक हॅक करण्यासाठी उत्तर कोरियाने ‘प्रॉक्सी सव्‍‌र्हर’चा वापर केल्याचे तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले, अशी माहिती एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी यांनी दिली. मॅनहटन येथे सायबर सुरक्षाविषयक परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
मात्र संगणक हॅक करणाऱ्यांकडून काही प्रमाणात झालेल्या हलगर्जीमुळे त्यांचे नेमके आयपी अ‍ॅड्रेस शोधणे शक्य झाले. हे तपशील केवळ उत्तर कोरियासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकांचे होते, असेही कॉमी यांनी सांगितले. त्यामुळे ‘सोनी सायबर हल्ल्यांमागे’ उत्तर कोरियाच आहे याबाबत मला तसेच जगभरातील गुप्तचर यंत्रणांना जराही संशय नाही, असे कॉमी यांनी स्पष्ट केले.
हा खरा पुरावा..
सोनी सायबर हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ‘मालवेअर’ही उत्तर कोरियात विकसित करण्यात आले होते. गेल्या वर्षी दक्षिण कोरियातील काही बँकांवर झालेल्या सायबर हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेली प्रणाली या हल्ल्यांमध्येही वापरली गेली होती, असेही जेम्स कॉमी यांनी स्पष्ट केले.
मात्र ते तपशील गुलदस्त्यातच.
सोनी सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच कशी आहे हे अमेरिकेने कसे शोधून काढले याबाबतचा तपशील आणि पद्धती मात्र आम्ही आता उघड करणार नाही, कारण उत्तर कोरियाचे पुढील लक्ष्य अमेरिका असेल, असा आमचा कयास आहे. स्वसंरक्षणार्थ या पद्धती गुलदस्त्यांतच ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.