मुलांचा गंभीर शारीरिक छळ केल्याच्या आरोपाखाली भारतीय सॉफ्टवेअर व्यावसायिक व त्याची पत्नी यांना नॉर्वेत अनुक्रमे १८ महिने व १५ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी गेल्या महिन्यात चंद्रशेखर वल्लभनेनी व त्यांची पत्नी अनुपमा यांना अटक केली होती. त्यांच्यावर मुलांना धमकावणे, वाईट वागणे, त्यांच्याशी हिंसक कृत्ये करणे असे आरोप होते. त्यांना या निकालावर अपील करण्यास दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
ऑस्लो जिल्हा न्यायालयाने भारतीय जोडप्यास मुलांचा छळ केल्याच्या आरोवावरून दोषी ठरवले आहे. न्यायालयाच्या मते या जोडप्याने हेतुपुरस्सर मुलाच्या पायावर गरम चमच्याने डाग दिले, त्या मुलाच्या शरीरावर भाजल्याच्या ३ बाय ५ सें.मी आकाराच्या डाग दिल्याच्या खुणा आहेत. एकदा तर या जोडप्याने त्यांच्या मुलाला जिभेवर गरम चमच्याने डागण्याची धमकीही दिली होती. न्यायालयाला असेही आढळून आले आहे, की आईवडिलांनी अनेकदा मुलाला पट्टय़ाने मारले. गेले सहा ते सात महिने ते या मुलाचा छळ करीत होते. त्यामुळे त्यांना छळ प्रकरणात कलम २१९ लावले आहे. वडिलांना १८ महिने तर आईला १५ महिने तुरुंगात टाकण्याची मागणी फिर्यादी पक्षाने केली होती ती न्यायालयाने जशीच्या तशी मान्य केली आहे.