हरियाणातील दलित कुटुंबावर सवर्णांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याच्या घटनेविषयी भाष्य करताना गुरूवारी केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह यांची जीभ घसरली. ते गाझियाबादमधील कार्यक्रमाच्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दलित कुटुंबातील दोन लहान मुलांच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरता येणार नाही. कुणी कुत्र्याला दगड फेकून मारला तर त्यामध्ये सरकारची काय चूक, असे सिंह यांनी यावेळी म्हटले. दलित कुटुंबातील लहान मुलांचा मृत्यू हे सरकारचे अपयश आहे का, असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला असता, सरकारला या घटनेशी जोडू नका. दोन कुटुंबातील वादातून हा सगळा प्रकार घडला असून सध्या या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितले. सिंह यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली असून त्यांना मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी केली आहे. सिंह यांच्या वक्तव्यासाठी पंतप्रधानांनी माफी मागावी, अशीही मागणी काँग्रेसने केली आहे.