भारतात असणारा काळा पैसा हा केवळ ५-६ टक्केच रोख रकमेच्या स्वरुपात असल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा नेहमीच नोटाबंदीला विरोध राहिला असल्याचे विधान आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केले. नोटाबंदीला ६० दिवस पूर्ण झाले आहेत. अनेक ठिकाणी एटीएममध्ये अद्यापही खडखडाट आहे. या काळात भारतीय रिझर्व्ह बॅंकेवर प्रामुख्याने टीका होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला सुरुवातीच्या काळापासूनच आरबीआयचा विरोधच आहे असे चक्रवर्ती यांनी रेडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

६-७ टक्के काळ्या पैशासाठी ९० टक्के जनतेला वेठीस धरण्याच्या निर्णयाचा आरबीआयने नेहमीच विरोध केला आहे असे ते म्हणाले. १९७८ ला पहिल्यांदा नोटाबंदीचा मुद्दा चर्चेत आला होता त्यावेळीच याची चर्चा सविस्तर चर्चा करण्यात आली होती. नोटाबंदीमुळे काहीच साध्य होणार नाही उलट इतक्या कमी प्रमाणातील पैशांसाठी गरीब आणि मजुरांचे प्रचंड प्रमाणात हाल होतील असे विचारात घेऊन हा निर्णय टाळण्याचा सल्ला आरबीआयने दिला होता.

नोटाबंदी म्हणजे ५ दहशतवादी मारण्यासाठी २०० लोकांनी भरलेली इमारत बॉम्बने उडवून देणे होय, असे चक्रवर्ती म्हणाले.
जे लोक श्रीमंत आहेत त्यांच्याकडे नेहमी साधन सुविधा अधिक असते. त्यांचा प्रभावही अधिक असतो त्यामुळे ते लोक नेहमीच पैसे लपविण्याचे मार्ग शोधून काढून शकतात आणि शेवटी गरीबच त्रस्त होतात म्हणून आरबीआयचा नोटाबंदीला नेहमीच विरोध राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

नोटाबंदीनंतर पैशांचे व्यवहार अनेक ठिकाणी ठप्प झाल्याचे दिसले. ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर चलनात जास्त नोटा ५०० च्या येणे अपेक्षित होते त्यामुळे सर्व लहान व्यवहार सुलभ झाले असते. ९ नोव्हेंबर रोजी आरबीआयने ३०-४० टक्के नोटा ५०० रुपयांच्या तयार ठेवल्या असत्या तर इतका चलनकल्लोळ माजला नसता असे त्यांनी म्हटले. परंतु, सरकारने २,००० रुपयांची नोट काढून आणखी त्रास वाढवून ठेवला. अनेक व्यवहारांसाठी ही नोट निरुपयोगी असल्याची टीका त्यांनी केली.

त्यात आणखी दुसरा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुरुवातीला २,००० रुपयांच्या नोटा छापल्यामुळे सरकारला नंतर घाईघाईत ५०० रुपयांच्या नोटा छापाव्या लागल्या. ५०० रुपये किंमत असलेल्या किती नोटा चलनात आल्या आणि त्या कशा वाढल्या याबद्दलची माहिती उपलब्ध असणे आवश्यक होते परंतु या घाईगर्दीमुळे बॅंकांजवळ यांची नोंद नव्हती असे ते म्हणाले. ५०० रुपयांच्या नोटांच्या तुटवड्यामुळे देशातील व्यवहार ठप्प झाल्याचे ते म्हणाले. ५०० रुपयांच्या नोटांच्या तुटवड्याचा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.