नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा असून हा घोटाळा तब्बल ८ लाख कोटी रुपयांचा असल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादावर कधीच निर्बंध बसणार नाही असे ते म्हणालेत.

अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ अर्थात वाराणसीमध्ये सभा घेतली. या सभेत केजरीवाल यांनी नोटाबंदीवरुन मोदींवर जोरदार टीका केली. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा असून या घोटाळ्यामुळे सर्वत्र गोंधळ माजल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. या घोटाळ्यामुळे मोदींच्या उद्योजक मित्रांना ८ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला असे त्यांनी सांगितले. बँकेतील लांब रांगांमध्ये उभे राहून लोकांचा मृत्यू होत आहे. तर काही ठिकाणी नोटाबंदीमुळे लोकांनी आत्महत्या केली आहे. हे सगळे मृत्यू म्हणजे एक प्रकारची हत्याच आहे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. नोटाबंदीमुळे सर्वत्र गोंधळ माजला असताना आणि उद्योगधंद्यांना याचा फटका बसत असताना मोदी शाही थाटात जीवन जगत आहेत. ते दिवसाला सहा वेळा कपडे बदलतात, मोठ्या विमानातून फिरतात अशी टीका त्यांनी केली. कॅशलेस व्यवहाराच्या मुद्द्यावरुनही केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष काळा पैसा रोख स्वरुपात स्वीकारतात, पण आम आदमी पार्टी मात्र धनादेश आणि इंटरनेट बँकिंगद्वारेच देणगी स्वीकारली जाते असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भाजप हा पक्ष ना हिंदूंचा आहे ना मुस्लिमांचा. हा पक्ष सत्ता आणि पैशांची हाव असलेल्यांचा आहे अशा तिखट शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.