प्रख्यात हिंदी कवी व भाजपचे माजी खासदार ओमसिंह निडर यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बिहारमधील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शहा यांनी पायउतार व्हावे, त्यांच्या जागी उत्तर प्रदेशच्या एखाद्या नेत्याकडे धुरा सोपवावी अशी सूचना त्यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा फायदा होईल असे समीकरण त्यांनी मांडले.
दिल्लीपाठोपाठ आता बिहारमध्ये पक्षाचा पराभव झाला असून, शहा आता तिसऱ्या पराभवाची वाट पाहात आहेत काय असा सवाल त्यांनी येथे एका कार्यक्रमास आले असताना केला. पंतप्रधानांना शहा यांची आवश्यकता असेल तर त्यांनी सल्लागार म्हणून नेमावे असा सल्लाही दिला. बिहारमध्ये भाजपला संघटनात्मक गैरव्यवस्थापन तसेच बहुसंख्य उमेदवारांना मतदारांशी संवाद साधता न आल्याने पराभव झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमाच आपल्याला विजय मिळवून देईल या हवेतच हे उमेदवार राहिल्याचा टोलाही निडर यांनी लगावला. तसेच हिंदुत्वाच्या मुद्दय़ापेक्षा जातीय समीकरणे वरचढ ठरल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.