देशभरात सुट्ट्या पैशांच्या अभावी दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झालेला असताना गुजरातमधील एका कार्यक्रमात पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. गुजरातमधील नवसारीमध्ये गुर्जर समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुट्या पैशांची उधळण करण्यात आली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम भजनसंध्येचा होता. या कार्यक्रमादरम्यान कलाकारांवर २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांची उधळण करण्यात आली.

गुर्जरांच्या समाज भवनासाठी भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फरीदा मीर आणि मायाभाई आहिर सहभागी झाले होते. कार्यक्रम सुरू असताना फरीदा आणि मायाभाई यांच्यावर अक्षरश: नोटांची उधळण करण्यात आली. संपूर्ण देशात लोकांकडे सुट्टे पैसे नसताना, सुट्टे नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत असताना गुजरातमध्ये सुट्या पैशांचा पाऊस पाडण्यात आला. साधारणत: ४० लाखांची रक्कम या कार्यक्रमादरम्यान उधळण्यात आले.

याआधी सूरतमध्ये एका संगीत कार्यक्रमात गायक कीर्तीदान गढवी यांच्यावर २ कोटी रुपयांची उधळण करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे उरी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांसाठी आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला. ‘वतन के रखवाले’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पुरुष, महिला आणि लहान मुलांनी पैशांची यथेच्छ उधळपट्टी केली. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये २ कोटींचा पाऊस पडला.