कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम काढण्यासाठी कर्मचारी ज्या कंपनीमध्ये काम करतो आहे त्या माध्यमातूनच अर्ज सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर मिळाला असेल, ते थेट आपली रक्कम काढण्यासाठी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडे अर्ज करू शकणार आहेत. भविष्यनिर्वाह निधीची प्रकरणे वेगाने निकाली काढण्यासाठी ही सर्व व्यवस्था ऑनलाईन करण्यात येते आहे. त्या दृष्टिनेच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सध्याच्या व्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी खात्यातील रक्कम काढण्यासाठी सध्याच्या किंवा पूर्वीच्या कंपनीकडून अर्ज सादर करावा लागत होता. कंपनीकडून अर्जाची छाननी करूनच ते पुढे पाठविण्यात येते होते. मात्र, आता प्रत्येक कर्मचाऱ्याला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणताही कर्मचार थेटपणे आपला अर्ज भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडे दाखल करू शकतो, असे केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनी सांगितले. या पद्धतीमुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे आणि त्यावर निर्णय घेणे पुढील काळात सोपे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत भविष्यनिर्वाह निधीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढण्याची सुविधा सुरू करण्यावर आमचा भर राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले