पॅरिसमधील दहशतवादी हल्ला संतापजनक आणि भयानक आहे. जगातील सर्वात मोठा धोका असलेल्या दहशतवादाशी सामना करण्यासाठी आपण मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र आले पाहिजे. त्यासाठी दहशतवादाची व्याख्या स्पष्ट करायला हवी. त्यानंतरच दहशतवादाविरोधात कोण आहेत आणि दहशतवादाला खतपाणी कोण घालते, हे स्पष्ट होईल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीसमधील हल्ल्याचा निषेध केला. जगाने दहशतवादाविरोधात लढा पुकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
वेम्ब्ले स्टेडीयमवरील भाषण आणि अनिवासी भारतीयांसोबत जेवण आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी हॉटेलमध्ये आल्यानंतर काही वेळेतेच फ्रान्समध्ये हल्ला झाल्याचे त्यांच्या अधिकारयांच्या टीमला कळले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट होताच मोदींनी पहिले टिवट केले, पॅरिसमधील बातमी संतापजनक आणि भयानक आहे. आम्ही या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. या संकटसमयी आम्ही फ्रान्सच्या जनतेसोबत आहोत.
लंडन महानगर पोलिसांनी तत्काळ मोदी राहत असलेल्या हॉटेलची सुरक्षा वाढवली. सुरक्षा व्यवस्थेसाठी ब्रिटिन प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी विशेष सुरक्षा गटाला (एसपीजी) दिला.
एसपीजी आणि ब्रिटिनचे सुरक्षा अधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते, असे ब्रिटन सरकारच्या सूत्रांनी सांगितले. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे फ्रान्सचे भारतातील दूतावास मोहन कुमार यांच्या संपर्कात होते. मोदी यांनी शनिवारी सकाळी हल्ल्याचा निषेध करताना जगाने दहशतवादाविरोधात लढा पुकारावा, असे आवाहन केले.
पॅरीसवरील हल्ल्याची बातमी लंडनमध्ये पसरताच लंडन पोलिसांनी महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला. हॉटेल, पब आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्याबरोबच गस्ती पथकांतही वाढ करण्यात आली होती. मोदींच्या हॉटेलजवळ बंदोबस्त वाढवण्याचे आदेश ब्रिटन सरकारने दिल्याचे लंडन पोलिसांनी सांगितले. लंडनमध्ये चौकाचौकात लोक हल्ल्याबाबत चर्चा करताना दिसत होते. अनेकांच्या मनात भीतीचा वावर होता.
जी-२० परिषदेत दहशतवादाचा मुद्दा
मोदी हे नियोजित कार्यक्रमाप्रमाणे जी-२० परिषदेसाठी तुर्कीमध्ये जाणार आहेत, असे अधिकारयांनी सांगितले. जी-२० परिषदेत दहशतवादाचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे, असे मानले जाते. या परिषदेत सहभागी होणारे २० देश जागतिक आर्थिक कार्यक्रमपत्रिकेवर चर्चा करणार आहेत.