मीटरच्या सर्किट बोर्डवर रिमोट कंट्रोल सर्किट लावून वीजकंपनीची फसवणूक

‘चिप’चा वापर करून पेट्रोलचोरी करणाऱ्या पेट्रोल पंपांवरील कारवाईची घटना ताजी असतानाच वीज मीटरमधील चिपमध्ये फेरफार करून वीजचोरीचा प्रकार रिलायन्स एनर्जीच्या दक्षता विभागाने नुकताच उघड केला. कंपनीच्या वितरण क्षेत्रात हायटेक वीजचोरी पकडण्यात आली असून देशभारात अशा पद्धतीने वीजचोरीचे मोठे जाळे विणले गेले असल्याचा संशय कंपनीने व्यक्त केला आहे. रिमोट कंट्रोल मीटर निकामी करून ही वीजचोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे.

रिलायन्स एनर्जीच्या मध्य विभागाच्या दक्षता पथकाने गणेश नगर, कांदिवली पश्चिम येथील एका इंजेक्शन मोल्डिंग युनिट चालवणाऱ्या मालकाला अत्याधुनिक उपकरण वापरून बेकायदेशीररीत्या वीजचोरी करताना पकडले. या वेळी ‘टाँग टेस्टर’वर केलेल्या तपासणीदरम्यान मीटरच्या मापदंडामध्ये तफावत असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित मीटर बोरिवली येथील राष्ट्रीय प्रमाणन मंडळाच्या तपासणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. या ठिकाणी केलेल्या तपासणीत मीटरच्या मागच्या बाजूस चौकोनी आकार कापलेला आढळला. तसेच मीटरच्या प्रिंटेड सर्किट बोर्डवर रिमोट कंट्रोल सर्किट आढळून आला. रिमोट कंट्रोल सर्किटद्वारे मीटरची रेकॉर्डिग सिस्टम नियंत्रित करण्यात येत होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून वीजवापर कमी दाखवला जात होता.

या प्रकरणी इस्लाम खान याच्यावर कांदिवली पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान याने या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ३१ हजार ७४१ युनिटची वीजचोरी केल्याचे उघड झाले असून वापरानुसार ही रक्कम सात लाख ५० हजार ०५२ रुपये इतकी होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने वीजचोरी करण्याचा हा प्रकार देशभर सुरू असून अशा प्रकारे रिमोट कंट्रोल सर्वत्र विकले जात असावेत, अशी माहिती रिलायन्स एनर्जीच्या प्रवक्त्यांनी दिली.

दोन वीजचोरांना अटक

रिलायन्स एनर्जीने चिंता कॅम्प, ट्रॉम्बे येथे कंपनींच्या वितरण जाळ्यातून तसेच मिनी पिलरमधून वीजचोरी करून बेकायदा वीज वितरण करणाऱ्या दोघांना अटक केली. आरोपी पायरोलकडून १२ मीटरच्या वायर, तर जाफर मुतालीफ पंजिकुटीकडून १८ मीटरच्या वायर जप्त करण्यात आल्या. या दोघांविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.