जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीबाहेर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची जमावानं ठेचून हत्या केल्यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आक्रमक झाल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्याची अशा प्रकारे निर्घृण हत्या केल्याची घटना लाजिरवाणी असल्याचं सांगून त्यांनी या घटनेचा निषेध केला. आतापर्यंत पोलीस, सुरक्षा दलाच्या जवानांनी जो संयम पाळला आहे, त्याचा परिणाम जर असाच होत असेल तर मग कठिण परिस्थिती उद्भवेल, असा इशाराच त्यांनी काश्मिरी जनतेला दिला आहे. पोलिसांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, असंही त्यांनी म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी लोक रस्त्यावर पोलिसांची जीप पाहून घाबरून पळून जात होते. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होईल, असंही त्या म्हणाल्या.

श्रीनगरजवळील नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर तैनात असलेले पोलीस उपअधीक्षक पंडित यांची जमावानं दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला असून, ही घटना लाजिरवाणी असल्याचं म्हटलं आहे. यापेक्षा अधिक लाजिरवाणं काय असू शकतं, असा सवाल त्यांनी केला आहे. पंडित हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी मशिदीबाहेर तैनात होते. येथील पोलीस सध्याच्या परिस्थितीतही संयम बाळगून आहेत. लोकांना हे समजलं पाहिजे. लोकांनी आपल्या वर्तणुकीत बदल करावा. अजूनही वेळ गेलेली नाही, असा इशाराच त्यांनी जनतेला दिला.

दरम्यान, काय चांगलं काय वाईट हे लोकांना समजलं पाहिजे. पंडित हे लोकांच्या सुरक्षेसाठी मशिदीबाहेर तैनात होते आणि जमावानं त्यांचीच हत्या केली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक एसपी वेद यांनी दिली. तर पंडित यांची हत्या झाली त्यावेळी फुटीरतावादी नेता मीरवाइज आणि त्यांचे समर्थक मशिदीत होते, असं वृत्त होतं. त्यामुळं हा नियोजित कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ही घटना घडली त्यावेळी आपण मशिदीत नव्हतो, असं मीरवाइज यानं स्पष्ट केलं आहे. पोलीस अधिकारी पंडित यांच्या मृ्त्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही मीरवाइजनं केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.