सत्तस्थापनेच्या वीस महिन्यांनंतरही पक्ष प्रवक्ते सरकारची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सारी सूत्रे हाती घेतली आहेत. पीक वीमा योजना, दलित उद्योजकांसाठी स्टार्ट अप या योजनांच्या प्रचारात भाजप प्रवक्ते कमी पडल्याची नाराजी पंतप्रधान मोदी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे नोंदवली आहे. त्यामुळे आता खुद्द पंतप्रधानच जाहीर सभांमधून विविध विषयांवर सरकारची बाजू स्पष्ट करणार आहेत.
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी भाजप नेते सरकारची बाजू सांगण्यास कमी पडल्याने मोदी नाराज झाले आहेत. सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती प्रसारमाध्यमांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवणारे प्रवक्ते दलित, असहिष्णुता आदी मुद्दय़ांवर प्रभाव पाडू न शकल्याने मोदीच आता मैदानात उतरले आहेत. त्यासाठी मोदी यांनी भाजपशासित मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा प्रभाव असलेल्या सिहोर जिल्ह्य़ात सभा निश्चित केली आहे. जमीन अधिग्रहण विधेयकावरून शेतकरी तर रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणावरून दलित, या दोन्ही समुदायांशी भाजपला अद्याप संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे आता मोदीच शेतकरीबहुल भागात चार सभा घेणार आहेत.
अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या सुधारित पीक वीमा योजनेची माहिती देण्यासाठी मोदींनी सभा आयोजित केल्या आहेत. प्रत्यक्षात ही योजना लागू झाल्यापासून यावर भाजप प्रवक्ते तसेच पक्षस्तरावरून प्रचार करण्यात आला नाही. आता मोदीच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रवक्ते त्यात कमी पडले, अशा स्पष्ट शब्दात मोदी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने येथील शेतकऱ्यांशी मोदी २८ फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत.