केंद्रीय निवड समितीकडून मंगळवारी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन.एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली. एन.एस. विश्वनाथन हे रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. ३ जुलै रोजी डेप्युटी गव्हर्नरपदावर असणाऱ्या एच.आर.खान यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे विश्वनाथन यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. एच.आर. खान यांनी डेप्युटी गव्हर्नरपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा व वित्तीय बाजार, परदेशी गुंतवणूक व व्यवहार, पेमेंट आणि सेटलमेंट, माहिती-तंत्रज्ञान, परकीय चलन आणि अंतर्गत ऋण व्यवस्थापन या विभागांची जबाबदारी सांभाळली होती.
डेप्युटी गव्हर्नरपदासाठी एन.एस. विश्वनाथन यांच्याबरोबर रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक एम.पात्रा, दिपाली पंत जोशी, चंदन सिन्हा आणि दिपक मोहंती यांच्यादेखील मुलाखती झाल्या होत्या. रिझर्व्ह बँकेचे एकुण चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. यापैकी दोघांची निवड अंतर्गत पद्धतीने होते (खान आणि आर. गांधी), तर उर्वरित दोघांपैकी एक व्यावसायिक बँकर ( बँक ऑफ बडोदाचे माजी अध्यक्ष एस.एस. मुंद्रा) आणि पतधोरण समितीचा मुख्य अर्थतज्ज्ञ (उर्जित पटेल) असतो.