डोकलाम परिसरातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये युद्धचर्चेचे मोहोळ उठले असताना चीनकडून आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. बीजिंग येथे होऊ घातलेल्या ‘ब्रिक्स’ देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘ग्लोबल टाईम्स’ या चीनच्या सरकारी वृत्तपत्राने भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लक्ष्य केले आहे. भारत-चीन सीमेवरील डोक्लाम परिसरात भारताने जी आक्रमक भूमिका घेतली आहे, ते कारस्थान अजित डोवाल यांनी रचल्याचा आरोप या वृत्तपत्राने केला आहे. ‘ग्लोबल टाईम्स’ हे चीन सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. यामधून बीजिंगमधील ब्रिक्स देशांच्या आगामी परिषदेसंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. ही परिषद नेहमीच्याच बैठकांसारखी असून यामध्ये काही विशेष नाही. त्यामुळे भारताने या परिषदेला भारत-चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमाप्रश्नासाठीचे व्यासपीठ करू नये, अशा इशारा चीनने दिला आहे.

एकवेळ पर्वत हलवू शकाल पण आम्हाला हरवू शकणार नाही, चीनची दर्पोक्ती

‘ग्लोबल टाईम्स’मधील संपादकीय लेखात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीरपणे लक्ष्य करण्यात आले आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमावादाला चिथावणी देण्यात त्यांचा प्रमुख वाटा आहे. मात्र, ब्रिक्स देशांच्या परिषदेत चीन या विषयावर कोणतीही चर्चा करणार नाही. जोपर्यंत भारतीय सैन्य चिनी भूभागातून माघार घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू, असे लेखात म्हटले आहे. त्यामुळे भारताने उगाच कोणतीही स्वप्ने रंगवू नयेत. यावरून डोवाल यांनी चीनशी कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या पदरी निराशाच पडेल. भारताची बिनशर्त माघार ही आमची ठाम भूमिका असल्याचे वृत्तपत्रात म्हटले आहे. चीनने माघार घेण्याचा प्रश्नच नाही. त्यापेक्षा भारताने आपले सैन्य माघारी घ्यावे, जेणेकरून त्यांची प्रतिष्ठा जपली जाऊन हा प्रश्न सुटेल. भारत आंतराष्ट्रीय कायद्याचे पालन करत असेल तर हा प्रश्न प्रतिष्ठेने सुटेल, असेही चीनकडून सांगण्यात आले आहे.

चीनशी आपण लढू शकू?