‘ब्रिक्स’ देशांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक बिजिंगमध्ये होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील सहभागी होणार आहे. त्यांचा हा दौरा भारत आणि चीनमध्ये डोकलाम परिसरातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला संघर्ष निवळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असा दावा चिनी विश्लेषकांनी केला आहे.

अजित डोवाल या बैठकीसाठी २७ आणि २८ जुलै रोजी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जीईची हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. ब्रिक्स म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांची सप्टेंबरमध्ये शियामेन शहरात शिखर परिषद होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची ही बैठक घेण्यात येत आहे, असे सांगण्यात येत आहे. या शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि चीन या दोन देशांत सिक्किम परिसरातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून संबंध ताणले गेलेले आहेत. हा तणाव कमी करण्यासाठी अजित डोवाल यांचा हा दौरा फलदायी ठरू शकतो, असा दावा चीनमधील आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या विश्लेषकांनी केला आहे. चिनी सरकारचं वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधील एका लेखात या विश्लेषकांनी हा दावा केला आहे.

डोकलाम परिसरात चीन आणि भारतीय सैनिक एका महिन्याहून अधिक काळ एकमेकांसमोर आले आहेत. भारतीय सैन्याने या परिसरात चीनकडून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याला विरोध केला आहे. रस्त्याचे काम भारतीय सैन्याने रोखून धरला होता. यावरून भारत आणि चीन या दोन देशांतील संबंध कमालीचे ताणले गेलेले आहेत. या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये युद्धचर्चेचे मोहोळ उठलेले आहे. त्यामुळे या दोन देशांतील ‘संघर्ष’ निवळण्यासाठी अजित डोवाल यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे, असे चीनच्या जाणकारांचे म्हणणे आहे. डोकलाम परिसरातील वादाच्या मुद्द्यावर डोवाल आणि चीनचे जीइची यांच्यात अनौपचारिक चर्चा होऊ शकते. हा तणाव कमी करण्यासाठी काय उपाय करता येणे शक्य आहे, यावर या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते. या मुद्द्यावर दोन्ही देशांनी मार्ग काढला नाही तर त्यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.