१९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी ८१४ विमानाचे अपहरण करण्यात आले, त्या वेळी त्या विमानाचा दुबईपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा गटाच्या (एनएसजी) कमांडोजनी पाठलाग केला होता, असा गौप्यस्फोट पाठलागाच्या त्या अपयशी प्रयत्नात सहभागी असलेल्या एका कमांडो अधिकाऱ्याने केला आहे. आम्हाला सरकारने माहिती देण्यात विलंब केला तोपर्यंत ते विमान अमृतसरहून निघाले होते, असेही एनएसजी ५२ या विमान अपहरणविरोधी कमांडो गटाच्या अधिकाऱ्याने सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सल्लागार असलेले रीसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ)या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी त्यांच्या पुस्तकात असा दावा केला होता, की त्या वेळी भाजप सरकारने बोटचेपी भूमिका घेऊन ते विमान जाऊ दिले. १९९९ मध्ये घडलेल्या त्या विमान अपहरणानंतर आम्ही दुबईपर्यंत त्या विमानाचा पाठलाग केला होता, बराच काळ आमचे खास विमान दुबईच्या आकाशात घिरटय़ा घालत होते पण आम्हाला उतरण्याची परवानगी न मिळाल्याने अपहृत विमानावर कारवाई न करताच माघारी यावे लागले, असे एनएसजीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. दुलत यांनी त्यांच्या पुस्तकात असे म्हटले होते, की आम्ही अमेरिकेने संयुक्त अरब अमिरातीवर दबाव आणावा यासाठी प्रयत्न केले होते पण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला पाठिंबा मिळाला नाही.एनएसजी ५२ हा खास कमांडो कृती गट विमान अपहरणविरोधी कारवाईसाठी असून त्या गटातील माजी कमांडो अधिकाऱ्याने सांगितले, की काठमांडू ते नवी दिल्ली या विमानाचे अपहरण डिसेंबर १९९९ मध्ये झाले होते, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात खूप विलंब झाला, ते विमान अमृतसरहून निघाल्यानंतर आम्ही त्या विमानाचा पाठलाग सुरू केला होता.
दुलत यांनी त्यांच्या पुस्तकात म्हणतात, की वरिष्ठ अधिकारी एकमेकांवर आरोप करण्यात दंग होते. त्यात मंत्रिमंडळ सचिव व एनएसजी प्रमुख (त्या वेळी निखिल कुमार प्रमुख होते) यांना लक्ष्य करण्यात आले. भाजपचे तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे, की याबाबत सर्व निर्णय विरोधी पक्षांशी सल्लामसलत करूनच घेण्यात आले होते.