युरोपमध्ये गेल्या तीस वर्षांत पक्ष्यांची संख्या ४२.१ कोटींनी कमी झाली आहे. त्यात घरांच्या परिसरातील चिमण्या, तितर, साळुंकी व चंडोल या पक्ष्यांचा समावेश आहे, असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. याउलट काही अभावाने आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या मात्र आश्चर्यकारकरीत्या वाढली आहे.
या अभ्यासानुसार युरोपात तीस वर्षांत पक्ष्यांची संख्या ४२.१ कोटींनी कमी झाली. त्यात नेहमी आढळणाऱ्या ३६ टक्के प्रजातींतील ९० टक्के पक्ष्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चिमण्या, साळुंकी, चंडोल यांसारख्या आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या घटली आहे.
एक्सटर विद्यापीठाचे रिचर्ड इंगर यांनी सांगितले, की पक्ष्यांच्या परिचित प्रजातींतील संख्या कमी होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे, कारण या पक्ष्यांपासून माणसाला अनेक फायदेही होते. मानवाचे कल्याण हे त्याचे वन्यजीवन व निसर्गाशी असलेल्या नात्याशी संबंधित आहे. नेहमीच्या पक्ष्यांचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा मानवी समाजावर विपरीत परिणाम होणार आहे. असे असले तरी सर्वच परिचित पक्ष्यांची संख्या घटलेली नाही. रॉबिन (दयाळ), ब्लू टीट, ग्रेट टीट व ब्लॅकबर्ड (युरोपातील एक गाणारा पक्षी) यांची संख्या वाढली आहे. बझर्ड (गिधाडे), मार्श हॅरियर (दलदल ससाणा), स्टोन कल्र्यू या पक्ष्यांची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढली आहे. संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे व कायदेशीर संरक्षणामुळे युरोपात काही पक्ष्यांची संख्या वाढली आहे. ज्या पद्धतीने आपण पर्यावरण हाताळतो आहोत त्यामुळे आपल्या परिचयातील पक्ष्यांना धोका आहे असा अर्थही यातून निघतो असेही संशोधकांनी म्हटले आहे. पक्षी संवर्धकांनी परिचयातील पक्ष्यांच्या अस्तित्वातही लक्ष घालणे गरजेचे आहे. आधुनिक शेती पद्धती, पर्यावरणाचा ढासळता दर्जा, अधिवासाचे विभाजन यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.
या अभ्यासात एकूण युरोपातील पक्ष्यांच्या १४४ प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. पंचवीस देशांत वेगवेगळय़ा पद्धतीने पाहण्या करण्यात आल्या. ‘इकॉलॉजी लेटर्स’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.
संख्या घटण्याची कारणे
आधुनिक शेती पद्धती
पर्यावरणाचा ढासळता दर्जा
अधिवासाचे विभाजन