शास्त्रीय संगीतातील खाच खळगे योग्यरित्या समजणारेच या संगीताचा आस्वाद घेऊ शकतात असं काहीच नसतं. भारतीय शास्त्रीय संगीताचे चाहते संपूर्ण जगभरात पसरले आहेत. त्यांना शास्त्रीय संगीतातील प्रत्येक बारकावे कळत नसले तरी श्रवणेंद्रीय तृप्त होणारं संगीत ऐकलं की त्यात ऐकणारा तल्लीन होऊन जातो. प्रकाशाच्या वेगाने बदल घडत असलेल्या सध्याच्या युगात शास्त्रीय संगीतात अनेक नवे बदल घडून येताना पाहायला मिळतात. त्यात शास्त्रीय संगीत क्षेत्र देखील मागे राहिलेले नाही. पॉप, रॉक आणि रॅप संगीताच्या चलतीमध्ये शास्त्रीय संगीताने आपले अढळ स्थान अद्यापही टिकवून ठेवले असले तरी तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी हल्ली शास्त्रीय संगीतात नवे प्रयोग पाहायला मिळतात. गेल्या तीन पिढ्यांहून शास्त्रीय संगीताचा वसा पुढे नेत असलेले संगीतकार किरण पाठक यांनी एक नवा प्रयोग केला आहे. पाठक यांनी तब्बल २० ते २५ बंदीश या इंग्रजीत भाषांतरीत करून त्या सादर केल्या आहेत. पाठक यांच्या नव्या प्रयोगाला इंटरनेटच्या महाजालात चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा कल अवलंबून आहे. काहींनी पाठक यांचे कौतुक केले आहे, तर काहींनी टीका देखील केली आहे.