अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे व्हिएतनाम व जपानच्या दौऱ्यासाठी रवाना झाले असून ते प्रथम हिरोशिमाला भेट देणार आहेत. हिरोशिमात अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता व तेथे भेट देणारे ते पहिले विद्यमान अमेरिकी अध्यक्ष असतील. ओबामा यांनी अणुहल्ल्याबाबत अमेरिकेच्या वतीने माफी मागावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. ओबामा दुपारी १.२० वाजता एअर फोर्स १ या त्यांच्या खास विमानाने निघाले असून अलास्का येथे एलमेनडॉर्फ एअर फोर्स बेस या ठिकाणी त्यांचे विमान इंधन भरण्यासाठी थांबणार आहे. ओबामा यांचा हा आशियातील दहावा दौरा असून विसाव्या शतकातील दोन कटू युद्धांचा वेदनादायी अध्याय मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
हनोई व हो ची मिन्ह शहरात ते भेटी देणार असून ते संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतील पण व्हिएतनाम युद्धाबाबत ते चूक कबूल करणार का, हा खरा प्रश्न आहे, १९७५ मध्ये संपलेल्या युद्धानंतरही लागू असलेले अमेरिकी शस्त्रास्त्र र्निबध उठवले जाणार का, हा खरा प्रश्न आहे. जपानमध्ये ओबामा हे जी ७ बैठकीस उपस्थित राहणार आहेत. १९४५ मध्ये अमेरिकी अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी पहिला अणुबॉम्ब टाकलेल्या हिरोशिमाला ते भेट देणार आहेत.