अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत दोन्ही देशांमधले संबंध दृढ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मोदींचे आभार मानले. ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाचा २० जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. या दिवशी अमेरिकेत नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप अध्यक्षपदाची शपथ घेतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी हा सोहळा आपल्याला पाहता येईल.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर फोन करून त्यांचं सगळ्यात आधी अभिनंदन करणाऱ्या राष्ट्रप्रमुखांपैकी बराक ओबामा एक होते. २०१५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून यायचं मोदींनी दिलेलं आमंत्रणही त्यांनी स्वीकारलं. त्याआधी मोदी आणि ओबामा यांच्यात सप्टेंबर २०१४ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली होती. त्यानंतर मोदी आणि ओबामा एकमेकांना आठ वेळा भेटले असून भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये दोन वर्षांतच एवढ्या भेटी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बुधवारी ओबामांनी मोदींना फोन करून गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या आठवणी काढल्या. अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी मोदींना केलेला हा शेवटचा फोनाकाॅल समजण्यात येतोय. ओबामांनी येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मोदींना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारत आणि अमेरिकेमध्ये अलीकडच्या काळाच वाढलेल्या आर्थिक आणि सुरक्षेबाबतच्या सहकार्याविषयी चर्चा दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली. या क्षेत्रांबरोबरच अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारताने अमेरिकेला केलेल्या सहकार्याबद्दल ओबामा यांनी मोदींना धन्यवाद दिले.

[jwplayer EgsawSD5]

गेले कित्येक दशकं भारत अमेरिकाविरोधी गटात सामील आहे असाच जगभर समज होता. सोव्हिएत रशियाच्या बाजूने झुकणाऱ्या भारताला अनेक वेळा रशियाने भारताच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आहे. १९७१सालच्या बांगलादेश युध्दाच्या वेळीही भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने बंगालच्या उपसागरात पाठवलेल आपलं आरमार रशियाच्या दबावामुळे काही करू शकलं नव्हतं आणि युध्दात भारताला मोठा विजय मिळाला होता.

पण २००३ च्या अणुकरारानंतर ही परिस्थिती हळूहळू बदलू लागली आणि भारत अमेरिका संबंधा सुधरू लागले. गेले काही वर्ष आणि विशेषत: गेल्या दोन वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये खूपच जवळीक साधली गेली आहे. एकीकडे पाकिस्तान,चीन आणि रशियासुध्दा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं दिसत असताना अमेरिका-भारत अनेक बाबतीत एकमेकांना सहकार्य करताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ओबामा यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होताना भारताच्या पंतप्रधानांना केलेला फोन महत्त्वाचा आहे