वादग्रस्त ड्रोन हल्ल्यांचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी समर्थन केले असून, ते कायदेशीर प्रभावी व न्याय्य युद्धासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे नवे दहशतवाद प्रतिकार धोरण जाहीर करताना त्यांनी पाकिस्तानसारख्या देशात ड्रोनचा वापर करण्याला काही नवीन मर्यादा घातल्या आहेत.
दहशतवादविरोधी धोरणावरील अत्यंत महत्त्वाच्या भाषणात त्यांनी नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी येथे असे सांगितले, की ड्रोनचा वापर आपण कमी करणार आहोत. ग्वाटेनामो बे येथील तुरुंग बंद करू व आपल्या देशाच्या युद्धक्षमतेत नवीन मर्यादा घालून देऊ. ओबामा यांच्या तासभराच्या भाषणात अनेक अडथळे आणून ते उधळून लावण्याचा प्रयत्न ‘रेड पिंक’ या युद्धविरोधी गटाचे सहसंस्थापक मेडिया बेंजामिन यांनी केला, त्यानंतर त्यांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी बाहेर काढले.
ड्रोनमुळे अमेरिकेचे अनेक नागरिक परदेशात मारले गेले आहेत याची ओबामा यांनी पहिल्यांदाच व्यक्तिगत कबुली दिली. असे असले तरी या मानवरहित सशस्त्र विमानाच्या वापराचे त्यांनी कायदेशीर, स्वसंरक्षणाचे प्रभावी साधन म्हणून समर्थन केले. दहशतवादाच्या विरोधात आपण या ड्रोन विमानांचा वापर यापुढेही करीत राहू असे त्यांनी स्पष्ट केले. आपण सध्या अशा संघटनांचा मुकाबला करीत आहोत. ज्यांना थांबवले नाही तर ते जास्तीत जास्त अमेरिकी लोकांना ठार करतील. त्यामुळे हे न्याय्य युद्ध आहे व एका मर्यादेत छेडलेले युद्ध आहे. तो दहशतवादावरचा शेवटचा पर्याय आहे व स्वसंरक्षणाचा उपाय आहे, असे ते म्हणाले.
ड्रोन हल्ले करण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे ओबामा यांनी घालून दिली आहेत. त्यात जे अतिरेकी अमेरिकी लोकांना धोका निर्माण करतील अशी शक्यता आहे त्यांच्याविरोधात ड्रोनचा वापर करता येईल. त्यातही नागरिक ठार किंवा जखमी होणार नाहीत याचीही खबरदारी घ्यावी, असे दंडक त्यांनी घालून दिले आहेत.
ड्रोन हल्ल्यात सामान्य लोक मारले जातात याचे आपल्याला दु:ख आहे, पण दहशतवादी गटांकडून असलेला धोका बघता काहीच न करणे हा पर्याय ठरत नाही, असे ते म्हणाले.
अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले, की ड्रोन फक्त अल् काईदा व तालिबानला लक्ष्य बनवीत आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांच्या सरकारांनी अनेक महिला व मुलांसह अनेक नागरिक ड्रोन हल्ल्यात मारले गेल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानात २००३ पासून ३३३६ लोक ड्रोन हल्ल्यात मारले गेले आहेत. ओबामा म्हणाले, की आम्ही सर्व देशांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करतो. पाकिस्तानात आम्ही लादेनला मारण्यासाठी जी कमांडो मोहीम राबवली तो काही निकष नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान होणार असलेले नवाझ शरीफ यांनी असे सांगितले होते, की सीआयएचे वादग्रस्त ड्रोन हल्ले बंद करावेत, कारण त्यामुळे आमच्या देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. ओबामा यांनी सांगितले, की आम्ही एका नव्या टप्प्यावर उभे आहोत. अमेरिकेचा स्वसंरक्षणाचा दावा हा काही चर्चेचा अंत नाही. कायदेशीर बाजूने विचार करता ड्रोन हल्ले कायदेशीर व प्रभावी आहेत. प्रत्येक वेळी त्यांचा वापर करणे नैतिक किंवा शहाणपणाचे आहे असे आपण म्हणणार नाही.