अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना घशाचा संसर्ग झाला असून त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले व फायबर ऑप्टिक चाचणीही करण्यात आली. त्यांचा घसा धरला असून त्यांच्या घशाला आम्लतेचा त्रास झाल्याचे आढळून आले आहे. ओबामा (५३) यांना मेरीलँड येथे वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर (बेथसडा) येथे नेण्यात आले. पोटातील आम्ल घशाशी आल्याने त्यांना त्रास झाला होता, मात्र त्यात गंभीर असे काही नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. कान-नाक-घसा तज्ज्ञांनी त्यांची फायबर ऑप्टिक तपासणी केली. गेले दोन आठवडे ओबामा यांना छातीत आणि घशाशी जळजळत होते, असे व्हाईट हाऊसच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. रॉनी एल. जॅकसन यांनी सांगितले. ओबामा यांच्या घशातील पेशी सुजलेल्या दिसून आल्या. केवळ नेहमीची तपासणी म्हणून सीटीस्कॅन करण्यात आले.