अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिरोशिमा येथे अणुहल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली वाहिली. ‘७१ वर्षांपूर्वी तेथे आकाशातून अणुबॉम्बच्या रूपाने मृत्युदूत उतरला व सगळे जगच बदलून गेले, दुसऱ्या महायुद्धाच्या भयानक आठवणी माझ्या मनात या वेळी जाग्या होत आहेत,’ असे ओबामा यांनी या स्मारकास भेट दिली असता सांगितले.
स्मारकावर पुष्पचक्र वाहताना ओबामा धीरगंभीर झाले होते. त्यांनी पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांच्यासमवेत तेथे भेट दिली, तेव्हा माथा झुकवून श्रद्धांजली वाहताना क्षणभर डोळे मिटून घेतले. अणुबॉम्बने स्वत:लाच नष्ट करण्याचे साधन तयार करता येते हे माणसाने दाखवून दिले, असे सांगून ते म्हणाले, की नजीकच्या भूतकाळात घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हिरोशिमात मी आलो आहे. त्या घटनेतील मृतांचे आत्मे आपल्याला अंतर्मुख होण्यास सांगत आहेत. तंत्रज्ञानात प्रगती होत असताना मानवतेची प्रगती झाली नाही, तर त्यामुळे अशा घटना घडतात. अणुविघटनाने विज्ञानात क्रांती झाली असली, तरी त्याला नैतिक क्रांतीची जोड आवश्यक आहे, त्यामुळे आपण येथे आलो. या शहरात आज उभे असताना अणुबॉम्ब पडला असताना त्या वेळी नेमके काय घडले असेल याची कल्पना मी करू शकतो.