इस्लामी दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे धगधगत असलेल्या इराकच्या उत्तरेकडील भागात अडकून पडलेल्या सर्वसामान्यांच्या सुटकेसाठी अमेरिका त्या भागात हवाई हल्ले करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एका संदेशात याबद्दल माहिती दिली.
अमेरिकेचे जवान केवळ आवश्यक ठिकाणी हवाई हल्ले करतील, हिंसाचारग्रस्त भागात उतरून दहशतवाद्यांविरोधात कोणीही लढणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या भागात अडकलेल्या लोकांना जेवणाची पाकिटे आणि पाणीही पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हिंसाचारग्रस्त भागात एका समुदायातील लोकांची दहशतवाद्यांकडून होत असलेली कत्तल अमेरिका डोळे बंद करून पाहू शकत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांनी आपला मोर्चा एर्बिल शहराकडे वळविण्याचा प्रयत्न केल्यास हवाई हल्ले करण्यास अमेरिकी जवानांना परवानगी देण्यात आली असल्याचे ओबामा यांनी सांगितले. एकूण नऊ मिनिटांच्या संदेशात ओबामा यांनी हा निर्णय घेण्यामागची कारणे काय आहेत, याचीही माहिती दिली. त्याचबरोबर हिंसाचारग्रस्त भागात अमेरिकेचा एकही जवान जमिनीवर उतरून कारवाई करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.