अमेरिकेतील निवडणूक प्रचारात करण्यात आलेली मुस्लीमविरोधी वक्तव्ये अक्षम्य असल्याचे मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले आहे. अमेरिका इस्लामला दडपण्याचा प्रयत्न करीत नाही हे दर्शवून देणे हा दहशतवादाविरोधात लढण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असेही ओबामा यांनी म्हटले आहे.
बाल्टिमोर, मेरीलॅण्ड येथील मशिदीतून मुस्लीम समाजाला उद्देशून केलेल्या भाषणात ओबामा यांनी वरील मत व्यक्त केले. देशातील मुस्लिमांच्या विरोधात अलीकडेच करण्यात आलेल्या राजकीय वक्तव्यांच्या उल्लेख करून ओबामा म्हणाले की, कोणत्याही धर्माविरुद्ध हटवादी भूमिका घेतली जात असल्यास अमेरिका ते शांतपणे पाहू शकत नाही.
एका धर्मावर केलेला हल्ला हा आपल्या सर्व धर्मावर केलेला हल्ला आहे, असे स्पष्ट करताना ओबामा यांनी मुस्लीम समाज आणि अमेरिकेतील शीख समाजावर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांची उदाहरणे दिली. कोणत्याही एका गटाला लक्ष्य केले जात असल्यास त्याविरुद्ध अमेरिकेतील नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे, आपल्याला धर्माचे स्वातंत्र्य आहे या वस्तुस्थितीचा आदर केलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.