जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे संशोधन

तीस कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या दीर्घिकेत एक कृष्णविवर ताऱ्याला गिळत असताना वैज्ञानिकांना प्रथमच पाहता आले व त्यातून प्रकाशाच्या वेगाने द्रव्याची ज्वाला बाहेर फेकली जात होती.
सूर्याच्या आकाराइतका तारा गुरूत्वीय ओढीने अतिजास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरात कोसळतो व गिळला जातो, असे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे सिजोर्ट व्हॅन व्हेलझेन यांनी सांगितले. त्यांनी हबल दुर्बिणीच्या मदतीने हे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, कृष्णविवराने तारा गिळताना पाहण्याची ही पहिलीच संधी आम्हाला मिळाली त्यातून शंकू आकाराच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. अनेक महिने हे नाटय़ अवकाशात घडत होते. कृष्णविवरे ही अवकाशातील अशी ठिकाणे आहेत जिथे गुरूत्वाकर्षणाने द्रव्य, वायू व प्रकाशही त्यातून बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे कृष्णविवरे दिसत नाहीत पण ती अवकाशात पोकळीचा परिणाम साधतात. खगोलवैज्ञानिकांच्या मते जेव्हा कृष्णविवर एखादा तारा गिळते तेव्हा त्याच्या जवळच्या भागातून चुंबकीय क्षेत्रातील मूलभूत प्लाझ्मा कण बाहेर पडतात. ते फार वेगवान असतात. हा आधी अंदाज होता पण आता तो खरा ठरला आहे. महा वस्तुमानाची कृष्णविवरे ही खूप जास्त वस्तुमानाच्या दीर्घिकांच्या मध्यावर असतात. आताचे हे कृष्णविवर शेवटच्या स्थानावर आहे व त्याचे वस्तुमान सूर्याच्या काही लक्ष पट अधिक आहे पण तरी त्याने तारा गिळला आहे. तारा गिळला जात असतानाची क्रिया गेल्या डिसेंबरमध्ये दिसली व नंतर रेडिओ दुर्बिणींनी त्याचा पाठपुरावा करण्यात आला. हे सर्व घडत असताना पृथ्वीवरील दुर्बिणींनी क्ष किरण, रेडिओ व प्रकाशीय संदेश पकडले. त्यातून या घटनेचे बहुतरंगलांबीचे चित्र तयार करता आले. तारा गिळताना या कृष्णविवरातून प्रवाह बाहेर पडले. कृष्णविवर असलेली दीर्घिका ३० कोटी प्रकाशवर्षे दूर आहे, बाकी कृष्णविवरे तीन पट दूर आहे. आंतरराष्ट्रीय पथकाने दीर्घिकेतील प्रकाश वेगळ्या कारणाने दिसत असल्याचे म्हटले होते व तारा गिळण्याशी त्याचा संबंध फेटाळला होता, पण अचानक प्रकाश वाढल्याने तारा कृष्णविवरात अडकल्याने निर्माण झाला होता. वेलझेन यांनी सांगितले की,
ताऱ्याच्या अवशेषांपासून बनलेले प्रवाह या घटनेची माहिती देतात. ‘जर्नल सायन्स’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला
आहे.