केंद्रीय मंत्र्यांचा थंड प्रतिसाद

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत वरचा क्रमांक असलेल्या दिल्लीत ‘सम-विषम’ प्रयोगाचा शेवट पारंपरिक लोहडी व मकर संक्रांतीच्या दिवशी तोंड गोड करून लोकांनी केला. गाझियाबादहून कामानिमित्त मध्य दिल्लीत येणारे प्रकाश साहू यांनी ‘कार-पूलिंग’ सहकाऱ्यांसमवेत या प्रयोगात हिरिरीने भाग घेतला. सणाच्या दिवशी तील-लड्डू देऊन त्यांनी १६ जानेवारीलादेखील ‘कार-पूलिंग’ करणार असल्याचा संकल्प केला. या प्रयोगाची मुदत शुक्रवारी (दि. १५) संपणार आहे. पुढील अंमलबजावणीसाठी सोमवारी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दक्षिण दिल्ली, लाजपत नगर, ग्रेटर कैलाश या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागातील नागरिकांनी या प्रयोगावर नाराजी व्यक्त केली. लाजपत नगरमधील गुलशन अरोरा म्हणाले की, आमच्या भागातून मध्य दिल्लीत येण्यासाठी साऊथ एक्सचा उड्डाणपूल आहे. सतत हा रस्ता गजबजलेला असतो. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. अशा वेळी या नियमाचा त्रास होतो. कारण स्वत:चे वाहन नाही व सार्वजनिक वाहतूक निश्चित स्थळी कधी पोहोचू, याची शाश्वती नसते. त्यामुळे सरकारने आधी रस्ते दुरुस्ती करावी मगच हा प्रयोग राबवावा.  दिल्लीकरांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना केंद्रीय मंत्र्यांकडून या योजनेस थंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरून आता आम आदमी पक्ष व भाजप कार्यकर्ते ट्विटरवर भिडले आहेत.