राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सम-विषम योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी १५ ते ३० एप्रिलपर्यंत करण्यात येणार असून याहीवेळी महिला, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि दुचाकी वाहनांना र्निबधांतून सूट दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी जाहीर केले.
सरकारला मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार, बहुतांश नागरिक ही योजना पुन्हा राबवण्यास अनुकूल आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्यात
पंधरा दिवसांसाठी ही योजना अमलात आणण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मात्र, यामुळे प्रवाशांच्या वाढणाऱ्या गर्दीची व्यवस्था करण्यास शहराची सार्वजनिक व्यवस्था सक्षम नसल्याचे त्यांनी मान्य केले.
१२ एप्रिलला दिल्लीतील शालांत परीक्षा संपल्यानंतर १५ ते ३० एप्रिलदरम्यान ही योजना अमलात आणली जाईल. यापूर्वीप्रमाणेच व्हीआयपी, महिला आणि दुचाकी वाहनांना तिच्या परिघाबाहेर ठेवले जाईल, असे केजरीवाल
म्हणाले.
सरकारच्या प्रदूषणविरोधी उपक्रमाचा भाग म्हणून यापूर्वी १ ते १५ जानेवारीदरम्यान ही योजना राबवली गेली होती. या योजनेत, विषम नोंदणी क्रमांक असलेली वाहने विषम तारखांना, तर सम नोंदणी क्रमांकाची वाहने सम तारखांना चालवण्याची परवानगी आहे.