ओदिशामधील गृहबांधणी क्षेत्राच्या नोंदणीकृत कामगारांना मासिक निवृत्तिवेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शनिवारी विधानसभेत केली. याखेरीज या कामगारांना घरांसाठीही अनुदान येणार असून हा सर्व खर्च सरकार उचलेल, असे पटनाईक यांनी सांगितले.
ज्या कामगारांची किमान पाच वर्षे नोंदणी झाली आहे, ते कामगार वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ५०० रुपये निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र ठरतील.
या कामगारांना घरांसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती पटनाईक दिली. त्यासाठी ‘निर्माण श्रमिक पक्का घर योजना’ राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
राज्याबाहेरून आलेल्या अशा कामगारांसाठीही अपघात विमा योजना राबविण्यात येणार असल्याचे नवीन पटनाईक यांनी सांगितले.