ओडिशात  १३ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत पाच टप्प्यांत पार पडलेल्या पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाची आज सर्वांना उत्सुकता होती. सर्व ठिकाणची मतमोजणी पूर्ण न झाल्यामुळे निवडणूक आयुक्तांनी निकालाची अधिकृत घोषणा केली नाही.

सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बिजू जनता दलाने आघाडी घेतली. तर भारतीय जनता पक्ष हा द्वितीय क्रमांकावर होता. बिजू जनता दलाची ४६२ जागी आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाने २९२ जागी आघाडी घेतली आहे. काँग्रेस ५७ ठिकाणी पुढे आहे तर १६ जागी इतर पक्षातील आणि अपक्ष उमेदवार पुढे आहेत. निकालाची प्रक्रिया उद्या पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

भारतीय जनता पक्षाने आनंदोत्सव साजरा केला आहे. मागील निवडणुकांच्या तुलनेत यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. मजमोजणीच्या सुरुवातीला भाजप आणि बीजेडी यांच्यात चुरस होती. भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरतो की काय अशी शक्यता वाटत होती परंतु सायंकाळी भारतीय जनता पक्षाची थोडी पिछेहाट झाली. बिजू जनता दलाने जोरदार मुसंडी मारत आपल्या जागा राखल्या.

राज्यातील ८५३ जिल्हा परिषद सदस्य, ६, ८०२ सरपंच, ६, ८०१ पंचायत समिती सदस्य, ९२, ०५२ ग्राम पंचायत सदस्यांसाठी मतदान पार पडले होते. यापैकी ५० टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित होत्या.

ओडिशामध्ये सत्ताधारी बिजू जनता दल, भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये लढत रंगली. बिजू जनता दलाने निवडणुकीत नेते आणि सिने कलाकारांची फौज मैदानात उतरवली होती. पण भाजपने बिजू जनता दलाला ‘कांटे की टक्कर’ दिली आहे. २०१२ च्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपला फक्त ३६ जागांवर विजय मिळाला होता. त्या तुलनेत यंदा भाजपला मिळालेले यश हे बिजू जनता दलासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. काही ठिकाणांचा अपवाद वगळता बाकी ठिकाणी मतमोजणी शांततेत पार पडली.

पुरी जिल्ह्यात नुआगाडा पंचायत समिती सदस्यपदासाठीच्या लढतीत ३ मतांना हारल्यामुळे महिला उमेदवार लता कंदी यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर त्या महिलेनी फेरमतमोजणीची मागणी केली होती.