गरिबीच्या झळा सोसणारा नवरा, त्याच्या खांद्यावर बायकोचा मृतदेह आणि शेजारी अश्रू ढाळणारी मुलगी. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य बघणे म्हणजे दगडाचे काळीज बनलेल्या प्रशासनाच्या ढीम्म कारभाराचे आणखी एक उदाहरणच म्हणावे लागेल. मरण आल्यावर माणूस त्याच्या यातनेतून मुक्त होतो, पण मेल्यानंतरही यातनेच्या पीडेतून या मृतदेहाची मुक्तता झाली नाही, असेच म्हणावे लागले. प्रशासनातील लोकांच्या दगडाच्या काळजामुळे एका पतीला आणि बारा वर्षांच्या मुलीला आपल्या आईचा मृतदेह खांद्यावरून १२ किलोमीटरपर्यंत घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळी आली. मरणानंतर त्यांची पुढची यात्रा सुखकारक होवो, अशी श्रद्धा ठेवणाऱ्या देशातले हे क्लेशकारक सत्य आहे. हा प्रकार ओडिशातील कलाहंडी गावात घडला.
दाना माजी यांच्या पत्नीचा आजारामुळे बुधवारी सकाळी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मृतदेह घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याची विनंती माजी यांनी रुग्णालयातल्या जवळपास सगळ्यांनाच केली. पण दुःखाचा डोंगर आणि गरिबीने हतबल झालेल्या या याचकाला मदत करावी, असे कोणालाही वाटले नाही. त्यांच्या दुःखाने एकाही पाषाणहृदयी माणसाला पाझर फुटला नाही शेवटी हतबल झालेल्या दाना यांनी आपल्या पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळून खांद्यावर घेतला आणि रुग्णालय ते घर असे ६० किलोमीटर अंतर पायी तु़डवण्याचा एकमेव पर्याय स्वीकारला. त्यांना मृतदेह खांद्यावर वाहुन नेताना पाहून स्थानिकांनी संबधित प्रशासनाला याची माहिती देत रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.
पण तोपर्यंत उशीर झाला होता. हे विदारक चित्र जगासमोर आलेही होती. याबद्दल ‘द इंडियन एक्सप्रेस’ने जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता आम्ही रुग्णवाहिकेची व्यवस्था केली असती पण रुग्णवाहिकेची वाट बघण्यासाठी दाना थांबले नाही, असे त्यांनी सांगितले. पण दुसरीकडे पैसे नसल्याने रुग्णवाहिकेची सोय करावी अशी विनंती सगळ्यांना केली होती पण कोणीही माझ्या विनंतीकडे लक्ष दिले नाही, असा आरोप दाना यांनी केला. दाना यांना मृतदेह वाहून नेताना पाहून पुढेच ४८ किलोमीटरपर्यंत रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. वास्तविक या राज्यात कोणत्याही व्यक्तीचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह हा रुग्णालय ते घर नेण्यासाठी निःशुल्क रुग्णवाहिकेची व्यवस्था सरकारने केली आहे. परंतु, असे असतानाही मृतदेह खांद्यावर वाहुन नेण्याचे दुदैवी प्रकार अनेकदा घडले आहेत.