राज्यात पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाल्याने आता देशात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. राज्य सरकारने व्हॅटसोबत ३ रुपयांचा दुष्काळ उपकर लावल्याने आता मुंबईत पेट्रोलचा दर ७७.५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. सध्याचे डॉलरचे मूल्य आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर लक्षात घेता तेल कंपन्यांना प्रति लीटर पेट्रोलसाठी २९.५४ रुपये मोजावे लागतात. मात्र मुंबईतील ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत पेट्रोलचा दर तब्बल ७७.५० रुपयांपर्यंत पोहोचतो. म्हणजेच ग्राहकांना तब्बल ४७.९६ रुपये कर म्हणून द्यावे लागतात. पेट्रोलवर नेमके कोणकोणते कर द्यावे लागतात आणि त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत पेट्रोलचा दर मूळ किमतीच्या तिपटीने कसा वाढतो, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

इंधन कंपन्या तेलशुद्धीकरण कारखान्यांमधून २६.८६ प्रति लीटर किमतीला तेलाची खरेदी करतात. यानंतर इंधन कंपन्या विपणनासाठी प्रति लीटर २.६८ रुपये खर्च करतात. यानंतर केंद्राकडून प्रति लीटर पेट्रोलवर २१.४८ रुपये अबकारी कर आकारला जातो. मुंबईत प्रति लीटर पेट्रोलवर १.१० रुपये ऑक्ट्रॉय आकारला जातो. हे सर्व कर आकारले गेल्यानंतर प्रति लीटर पेट्रोलचा दर ५२.३२ रुपये इतका होतो.

प्रति लीटर पेट्रोलचा दर ५२.३२ रुपये इतका झाल्यावर २६ टक्के व्हॅट लावण्यात येतो आणि ९ रुपयांचा वेगळा उपकर आकारला जातो. यामुळे पेट्रोलच्या दरात प्रति लीटर २२.६० रुपये इतकी वाढ होते. यानंतर पेट्रोलवर डिलर्सकडून २.५८ रुपये कमिशन आकारले जाते. त्यामुळे प्रति लीटर पेट्रोलचा दर ७७.५० रुपयांवर जातो. केंद्र आणि राज्य सरकारकडून पेट्रोलवर तब्बल १५३ टक्के कर आकारला जातो. राज्यात सध्या पेट्रोलचा दर ७७.५० रुपये इतका आहे. तर दिल्लीत एक लीटर पेट्रोलसाठी ६८.२६ रुपये मोजावे लागतात.

मुंबईतील पेट्रोलचे दर देशात सर्वाधिक आहेत. मुंबईसह देशभरातील राज्यांमध्ये पेट्रोलवर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोलच्या मूळ दराच्या दुप्पट कर देऊन पेट्रोल अव्वाच्या सव्वा किमतीला खरेदी करावे लागते. भारताशेजारील देशांचा विचार केल्यास पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर ४३.६८ रुपये इतका आहे. तर श्रीलंकेत प्रति लीटर पेट्रोलसाठी ५०.९५ रुपये मोजावे लागतात. नेपाळमध्ये पेट्रोलचा दर ६४.२४ रुपये इतका आहे. बांगलादेशमध्ये पेट्रोल ७०.८२ रुपयांना मिळते.