५०० व १ हजार रूपयांच्या नोटाबंदीचा निर्णय होऊन आज (गुरूवार) एक महिना पूर्ण झाला. संसदेत याप्रकरणी विरोधीपक्षांकडून अजूनही गोंधळ सुरूच आहे. बँकासमोरील रांगाही कमी झालेल्या नाही. त्यातच आता केंद्र सरकारने १० डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर रेल्वे, बस आणि मेट्रो तिकिटांसाठी जुन्या ५०० रूपयाच्या नोटा चालणार नसल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

गत ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा ५०० व १००० रूपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. भ्रष्टाचार, काळा पैसा व दहशतवाद नेस्तनाबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचवेळी या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बँकेत भरण्याची मुभा त्यांनी दिली होती. सुरूवातीला रेल्वे, रूग्णालये, मेट्रो, पेट्रोल पंप, ५०० रूपयांचे मोबाइल रिचार्ज, औषधे घेण्यासाठी आदी बाबींसाठी या नोटा वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. नंतर ती फक्त रेल्वे, मेट्रो रेल्वे, मोबाइल रिचार्ज, औषधे व पेट्रोल पंप यासाठीच मुभा देण्यात आली. आता नव्या निर्णयानुसार येत्या १० डिसेंबरपर्यंतच रेल्वे, मेट्रो व बससेवेसाठी हे पैसे वापरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, जास्तीत जास्त नागरिकांना याकडे आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून गुरुवारी मोठा निर्णय घेतला. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या साह्याने केल्या जाणाऱ्या २००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर यापुढे सेवा कर आकारण्यात येणार नाही. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी एकूण खरेदीवर दोन टक्के सेवाकर आकारण्यात येत होता.

पाचशे आणि दोन हजार रुपयाच्या नव्या नोटांसाठी एटीएमचे रिकॅलिब्रेशन करावे लागणार होते. त्यानुसार देशभरातील ९५% रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. मात्र यातील फक्त ३५% एटीएम पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे रिकॅलिब्रेशन पूर्ण होऊनही अनेक एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. त्यामुळे रोकड उपलब्ध नाही, एटीएम सेवा बंद आहे, असे फलक एटीएमबाहेर पाहायला मिळत आहेत. काही एटीएम केंद्रांचे शटर तर अनेक दिवसांपासून बंदच आहेत.