ऑस्ट्रेलियात पृथ्वीवरील सर्वात जुने जीवाश्म सापडले असून, त्यात याच काळातील काही जिवाणूंचे अंशही सापडले आहेत. पृथ्वीच्या निर्मितीनंतर काही अब्ज वर्षांनंतरचे हे जीवाश्म आहेत असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील पिलबारा भागात हा जीवाश्म सापडला आहे.
नोरफ्लोक येथील ओल्ड डॉमिनियन विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्रज्ञ नोरा नॉफके यांनी सांगितले, की सर्वात जुन्या जीवाश्मातील जिवाणूंचे हे अवशेष सर्वात पुरातन आहेत. ते आपले सर्वात जुने पूर्वज आहेत.
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की जर हे जीवाश्म ३.४९ अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत व जर ते खरे असेल तर पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीबाबत आपल्या आकलनात मोठी भर पडणार आहेत. इतर ग्रहांवर प्राचीन काळात कशी स्थिती होती यावरही त्यामुळे नवीन प्रकाश पडणार आहे. डायनॉसॉरप्रमाणे हे काही शरीराच्या भागांचे जीवाश्म नाहीत. वालुकाश्मावरील अतिशय सूक्ष्म अशा खुणांच्या रूपातील जे जीवाश्म असून ते त्या काळातील जिवाणूंचे अस्तित्व दाखवतात.
नॉफके व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विशिष्ट अश्मांचे कार्बन पद्धतीने मापन केले, त्यात ९९ टक्के भाग हा कार्बन-१२ या मूलद्रव्याचा असून, ते कार्बन-१३ या मूलद्रव्यापेक्षा वजनाने हलके आहे. त्याचा एक टक्का भाग हा या कार्बन-१३ चा बनलेला आहे.
जे सूक्ष्म जीव प्रकाशसंश्लेषणाच्या मदतीने अन्न तयार करतात, त्यांच्यात कार्बन-१२चा वापर जास्त तर कार्बन-१३चा वापर कमी प्रमाणात केला जातो. हा कार्बन म्हणजे सेंद्रीय कार्बन असतो जो सजीवांमधून येतो, तोच कार्बन ऑस्ट्रेलियात सापडलेल्या खडकात दिसून आला आहे. अलीकडच्या सूक्ष्म जीवांच्या अवशेषात फोटो सिंथेटिक सायनोबॅक्टेरिया या प्रकारच्या जिवाणूंचा समावेश असतो हे जिवाणू असे अन्न तयार करतात जे इतर जिवाणूंना जगण्यास उपयुक्त असते.
आता सापडलेल्या जिवाणूंचे अवशेष हे फायकोसायनिन सायनोबॅक्टेरिया या जिवाणूंचे मानले जात असून ते ऑक्सिजनची निर्मिती करतात, त्यांच्यापासून २.४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच्या वातावरणाची निर्मिती झाली. सायनोबॅक्टेरिया हे सूक्ष्म जीवांच्या अवशेष असलेल्या खडकात साडेतीन अब्ज वर्षांपासून राहात होते, त्यामुळे आपण श्वसनासाठी जी हवा वापरतो तिचा इतिहासच बदलून जाईल असा दावा शोधनिबंधात करण्यात आला आहे. टेक्सासच्या ए अँड एम विद्यापीठाचे भूजीवशास्त्रज्ञ मायकेल टाइस यांनी सांगितले, की अशा प्रकारच्या पुरातन सूक्ष्म जीवांच्या अवशेषांचा अभ्यास म्हणजे पृथ्वीच्या पूर्वायुष्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न आहे. जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या बैठकीत हा शोधनिबंध सादर करण्यात आला आहे.