‘जम्मू काश्मीरमधील अशांततेचे खापर फक्त पाकिस्तानवर फोडून चालणार नाही,’ असे वादग्रस्त विधान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. ‘जम्मू काश्मीरमधील अस्वस्थतेसाठी फक्त पाकिस्तान जबाबदार नाही. राज्यातील लोकांशी संवाद न साधणाऱ्या सरकारच्या चुकांमुळेही राज्यात अस्वस्थता आहे,’ असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

‘काश्मीरमधील अस्वस्थतेला पाकिस्तान जबाबदार आहे, असा गैरसमज कोणी करु घेऊ नये. हा आपल्या चुकांचा परिणाम आहे. काश्मीर खोऱ्यातील सध्याच्या राजकीय स्थिती आणि अशांततेसाठी फक्त पाकिस्तानला जबाबदार धरणे म्हणजे सत्य स्थितीचे वर्णन चुकीच्या पद्धतीने केल्यासारखे होईल,’ असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. बारामुल्लामधील नॅशनल काँफरन्सच्या कार्यक्रमाला संबोधित करताना ओमर अब्दुल्ला यांनी हे वादग्रस्त विधान केले.

‘जेव्हा बाहेरचे कोणीही जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालत नव्हते, तेव्हाही जम्मू काश्मीरमधील लोकांची राजकीय भावना आतासारखीच होती. हीच राजकीय भावना राज्याला मिळालेल्या विशेष दर्जाचा आधार आहे. मात्र आता हीच भावना कमकुवत केली जाते आहे,’ असे म्हणत ओमर अब्दुल्ला यांना राज्यातील पीडीपी आणि भाजप या सत्ताधारी पक्षांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

‘नवी दिल्लीत आलेल्या सरकारांनी दिलेली आश्वासने पूर्णत्वास नेली नाहीत. हीच अपूर्ण आश्वासने जम्मू काश्मीरमधील स्थितीसाठी कारणीभूत आहेत. आज परिस्थिती कित्येक पटीने बिघडली आहे. कारण केंद्रातील विद्यमान सरकारला काश्मीरमध्ये कोणतीही समस्या आहे, असे वाटतच नाही,’ अशा शब्दांमध्ये ओमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘सत्ताधारी भाजप-पीडीपी आणि या पक्षांच्या सरकारचे नेतृत्त्व करणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांचे वर्तन विरोध पक्षात असताना वेगळे होते. आता सत्तेत असल्यापासून त्यांच्या बराच फरक पडला आहे’, अशी टीका ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.