समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची कार झाडावर आदळली आणि त्या अपघातात त्यांचे निधन झाले. हरियाणातील समाजसेवक आणि भाजप नेता ओमप्रकाश बहलवाला हे चंडीगडवरुन परतत असताना त्यांच्या कारला भिवानीजवळ अपघात झाला. समोरुन अचानकपणे एक दुचाकी आली. त्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी चालकाने आपली दिशा बदलली आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ती गाडी झाडावर जाऊन आदळली. या अपघातात बहलवाला यांचे निधन झाले. असे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार शशिरंजन परमार हे देखील होते. ते जखमी झाले आहेत.

ओम प्रकाश हे या भागात ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ओळखले जातात. ते बिट्स समूहाचे अध्यक्ष देखील होते. ते कामानिमित्त चंडीगडला गेले होते. आपल्या घरी परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. शशिरंजन परिमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परमार हे ओमप्रकाश यांचे खास सहकारी मानले जातात. त्यांच्या राजकीय सल्लागाराची भूमिका देखील ते पार पाडत असत. त्यांना भिवानी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारचे चालक रवी यांना देखील येथेच दाखल करण्यात आले आहे.

रवी आणि परमार या दोघांचीही परिस्थिती आता चिंताजनक नसल्याचे परमार यांचे मोठे भाऊ सुरेंद्र परमार यांनी म्हटले. या घटनेचे वृत्त समजताच गावातील सर्व प्रतिष्ठित लोक तातडीने रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी गेले आहेत. भिवानी येथील राजकीय नेते घनश्याम सराफ हे रुग्णालयात त्यांची विचारपूस करण्यासाठी येऊन गेले. ओमप्रकाश यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. या शहरात बिट्स समूहाच्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक वातावरण निर्माण केले. परमार यांच्या सहकार्याने त्यांनी मुलींना शिक्षणासाठी मदत केली. त्यांच्या संस्थेच्या अनेक शाळा आणि कॉलेज या ठिकाणी आहेत. ओमप्रकाश यांच्या मृत्यूमुळे भिवानी भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.