आक्रमक प्रचारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भाजपकडून आजपर्यंत प्रचाराचे अनेक फंडे आजमवण्यात आले आहेत. जनतेत पक्षाचा प्रसार किंवा प्रसिद्धी करण्याची एकही संधी गेल्या काळात भाजपने दवडलेली नाही. दिल्लीहून अमृतसरला जाण्यासाठी निघालेल्या शताब्दी एक्सप्रेसच्या प्रवाशांना गुरूवारी या सगळ्याचा प्रत्यय आला. जेव्हा गाडीतील काही प्रवाशांनी चहा विकत घेतला तेव्हा, चहाच्या कागदी कपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची छायाचित्रे दिसून आली. याशिवाय, या चहाच्या कपांवर एका संदेशाच्या माध्यमातून भाजपमध्ये सामील होण्याचे आव्हानही करण्यात आले होते. त्यामुळे आता याप्रकरणावरून नवा वाद उद्भवला आहे.
गेल्या आठवडाभरापासून हे कप शताब्दी एक्सप्रेसमध्ये वापरले जात आहेत. भाजपची जाहिरात असलेल्या या कपांवर संकल्प फाऊंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेचे नाव छापले आहे. शताब्दीमध्ये केटरींगचे कंत्राटही याच संस्थेशी संलग्न असलेल्या लोकांकडे आहे. “हे कप प्रचारसभांमध्ये वापरले जातात. पण चुकून ते रेल्वेमध्ये वापरण्यात आले. रेल्वेमध्ये स्वच्छ भारत अभियानाचे कप पाठवायचे होते. पण त्याऐवजी चुकीचे कप पाठवण्यात आले”, असे संकल्प फाऊंडेशनच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वेने कोणालाही अशा कपांच्या वापराची परवानगी दिलेली नाही. रेल्वेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी करता येऊ शकत नाही. याबाबत ताकीद देण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल, असे रेल्वेचे फिरोजपूर विभागाचे डीआरएम नरेशचंद्र गोयल यांनी सांगितले.