पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने खळबळ

जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर बंदी घालण्याचा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा निर्णय चुकीचा होता हे मान्य करण्यात आपल्याला अजिबात संकोच वाटत नाही, असे सांगत माजी केंद्रीय अर्थमंत्री व वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी स्वपक्षीयांत खळबळ उडवून दिली. येथे भरलेल्या ‘टाइम्स लिटफेस्ट’ या साहित्यविषयक महोत्सवात ‘भारत उदारमतवादी प्रजासत्ताक देश आहे का?’ या विषयावर बोलताना त्यांनी हे विधान केले.
राजीव १९८६ ते १९८९ या काळात पंतप्रधान होते. त्यांच्या मंत्रिमंडळात चिदंबरम यांच्याकडे गृह विभागाचे राज्यमंत्रीपद होते. त्यांच्याच कार्यकाळात ऑक्टोबर १९८८मध्ये वादग्रस्त ठरलेल्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या रश्दी यांच्या कादंबरीवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी चुकीची असल्याचे चिदंबरम यांनी २७ वर्षांनंतर मान्य केले. चूक कबूल करण्यास इतकी वर्षे का लागली, या प्रश्नावर आपण वीस वर्षांपूर्वीही हेच उत्तर दिले असते, असे त्यांनी सांगितले. खुद्द इंदिरा गांधी यांनीही आणीबाणी लादणे चूक असल्याचे १९८०मध्ये मान्य करत पुन्हा सत्तेवर आल्यावर कधीही आणीबाणी न लादण्याचे वचन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले, याचीही आठवण त्यांनी करून दिली.
भारतात असहिष्णुतेसंदर्भात सुरू असलेल्या वादावरही चिदम्बरम यांनी आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले की, देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेची मला सर्वाधिक काळजी वाटते. आपण एक असहिष्णू समाज झालो आहोत. सध्या असहिष्णुतेत वाढ होत आहे. देशात वेगवेगळ्या प्रकारच्या बंदी घालण्याची स्पर्धाच लागली आहे. परंतु, हा नैतिक बहुसंख्याकवाद कायमच अपयशी ठरेल.