लेखिका शोभा डे आणि वाद हे नित्याचेच झाले आहे. वादग्रस्त ट्विटर करून त्या सतत चर्चेत असतात. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या प्रदर्शनावरून त्यांनी केलेल्या ट्विटवरून बरेच वादळ उठले होते. अनेक सेलिब्रटिंनी शोभा डे यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा एका ट्विटमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक व चमकदार कामगिरी करणाऱ्या जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांना सचिन तेंडुलकर याच्या हस्ते बीएमडब्ल्यू भेट देण्यात आली. या पार्श्वभूमीवर शोभा डे यांनी आणखी एक ट्विट करून वादाला तोंड फोडले आहे. खेळाडूंना दिलेल्या बीएमडब्ल्यू त्यांच्यासाठी पांढरा हत्ती न ठरो अशी आशा व्यक्त केली आहे. या ट्विटमुळे संतापलेल्या नेटिझन्सनी शोभा डे यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.
ऑलिम्पिकमध्ये प्रांरभी भारताला पदक मिळवण्यास अपयश आले होते तेव्हा त्यांनी रिओला जाऊन सेल्फी काढायचे आणि रिकाम्या हातांनी परतायचे, हेच भारतीय खेळाडूंचे रिओ ऑलिम्पिकमधील लक्ष्य असल्याचे ट्विटरवर म्हटले होते. भारतीय खेळाडू पैसा आणि संधी दोन्हीचा अपव्यय करत असल्याचेही त्या काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. जेव्हा भारताने पदक मिळवले तेव्हा अमिताभ बच्चन, वीरेंद्र सेहवाग आदींनी शोभा डे यांचा समाचार घेतला होता.
सोमवारी केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, बीएमडब्ल्यूची ही चांगली जाहिरात आहे. पण या गाड्या चालवण्यासाठी खर्च कोण देणार आहे? आशा करूयात त्यांच्यासाठी या कार पांढरा हत्ती ठरू नयेत. त्यांच्या या ट्विटनंतर नव्याने ऑनलाईन वाद सुरू झाला आहे.