नेवार्ककडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला आपल्यामुळे उशीर झाला नसल्याचे सांगत या संदर्भात खोटी माहिती पसरविणाऱयांवर महाराष्ट्रात परतल्यावर बदनामीचा खटला दाखल करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून दिला.

२९ जून रोजी देवेंद्र फडणवीस सात जणांच्या शिष्टमंडळासह आठवडाभराच्या अमेरिका दौऱयावर रवाना झाले. त्यांच्या शिष्टमंडळातील सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी व्हिसा असलेला पासपोर्ट घरीच विसरल्यामुळे तो येईपर्यंत फडणवीस यांच्या सांगण्यावरून एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण रोखण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध झाली. रात्री दीड वाजताची प्रस्थानाची वेळ असलेल्या या विमानाचे उड्डाण अडीच वाजण्याच्या सुमारास झाले. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच या विमानाचे उड्डाण रोखून धरण्यात आल्याची माहिती त्यांनी पूर्णपणे फेटाळली. हे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर मी वेळेत विमानामध्ये बसलो होतो, तर शिष्टमंडळाशिवाय मी प्रवास करणार नाही, असे मी कसे काय म्हणू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर विमानामध्ये माझ्या मागे आणि पुढे बसलेल्या प्रवाशांकडूनही आपण विमानामध्ये शांतपणे बसलो होतो, याची माहिती मिळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. विमानाला उशीर झाल्याच्या प्रकारावरून चुकीची माहिती पसरविणाऱयांवर बदनामीचा खटला दाखल करू, असेही त्यांनी म्हटले आहे.