पश्चिम बंगालमधील एका कॉन्व्हेंटमध्ये शिरून जोगिणीवर (नन) बलात्कार केल्याच्या प्रकरणात गुन्हेअन्वेषण विभागाने (सीआयडी) गुरुवारी दोन बांगलादेशी नागरिकांना कोलकाता व मुंबईत अटक केली. नादिया जिल्ह्य़ातील राणाघाट येथे ७१ वर्षांच्या या जोगिणीवर बलात्कार करण्यात आल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती.
सिकंदर शेख ऊर्फ सलीम या आरोपीला गुरुवारी मध्यरात्री मुंबईत अटक करण्यात आली, तर दुसरा आरोपी गोपाल सरकार याला उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील हाबरा येथे ताब्यात घेण्यात आल्याचे पश्चिम बंगाल सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक दिलीप अदक यांनी पत्रकारांना सांगितले.
पश्चिम बंगाल पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने सलीम याला दक्षिण मुंबईतील नागपाडा येथे अटक केली.
आपण या गुन्ह्य़ात सहभागी असल्याचे त्याने कबूल केले. त्याच्या चौकशीनंतर याप्रकरणी अधिक माहिती मिळेल असे अदक म्हणाले.
२००२ सालापासून बेकायदेशीररीत्या पश्चिम बंगालमध्ये राहणारा दुसरा बांगलादेशी नागरिक गोपाल सरकार याने हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना आश्रय दिला होता. या गुन्ह्य़ातील इतर साथीदार कोण होते, हे गोपालच्या चौकशीवरून कळू शकेल. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल, असेही अदक यांनी सांगितले.
दरम्यान, सलीम याला राणाघाट येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पापिया दास यांच्यापुढे हजर करण्यात आले असता, त्यांनी सलीमला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कुणाही वकिलाने सलीमचे वकीलपत्र घेतले नाही.

कृत्यामागे चोरीचा उद्देश?
१४ मार्च रोजी झालेल्या या घटनेत चार जणांचा सहभाग असल्याचे सीसी टीव्ही चित्रीकरणावरून लक्षात आले होते. ही टोळी शाळेत शिरली आणि त्यांच्यापैकी ३-४ जणांनी जोगिणीवर बलात्कार केला. जाताना या लोकांनी शाळेच्या लॉकरमधून १२ लाखांची रोकडही लंपास केली. आरोपी बांगलादेशात पळून गेल्याची शंका वाटल्याने पश्चिम बंगाल सरकारने या घटनेच्या सीबीआयमार्फत तपासाची शिफारस केली होती.