देशातील कोणत्याही नागरिकाला आपली देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही, असे सांगत बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आपला सहअभिनेता आमीर खानच्या मदतीला धावून आला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाहरूख खान म्हणाला, देशाबद्दल चांगला विचार करणे आणि चांगले काम करणे याशिवाय देशासाठी आणखी वेगळे काही काम करण्याची गरज नसते. प्रत्येकाने देशाच्या भल्यासाठीच काम केले पाहिजे. जर मी माझ्यावरील जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असेल, तर मला देशासाठी आणखी वेगळे काही करण्याची गरज नाही. माझ्या कामातूनच देशाला फायदा होणार आहे. पण जर मी भ्रष्टपणे वागत असेल, तर नक्कीच त्यातून माझ्या देशाची प्रतिमा मलिन होणार आहे.
सोशल मीडियाच्या साईट्सवर लोक मुक्तपणे आपली मते मांडत असतात. त्यामध्ये काही जण तीव्र विरोधाच्या प्रतिक्रियाही व्यक्त करतात. त्यातून दुसऱ्याची बदनामी केली जाते. यातच एखादे सर्वसाधारण वाक्यही आक्षेपार्ह ठरू शकते, असेही शाहरूख खान म्हणाला.
आमीर खान याने गेल्या आठवड्यात देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली होती. त्यावरून अनेकांनी आमीर खानला विरोध केला होता. त्याच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.